गुजरात आणि मुस्लीम खासदार

देशभरातच गुजरात या राज्याविषयीची चर्चा होताना विरोधकांकडून गोध्रा हत्याकांडाचा उल्लेख केला जातो. या घटनेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना हिंदुत्ववादी आणि मुस्लीम विरोधी संबोधून टीका करण्यात येते. गुजरातमध्ये मुस्लीम समाज भयभीत अवस्थेत जगत असल्याचेही आरोप होतात. यानिमित्ताने गुजरातमधील मुस्लीम मतदारांची आणि लोकप्रतिनिधींची स्थिती काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करुया. गुजरातमध्ये एकूण लोकसंख्येच्या 9.5 टक्‍के मुस्लीम लोकसंख्या आहे.

गांधीनगर या भाजपाच्या बालेकिल्ल्यामध्ये 4 लाखांहून अधिक मुस्लीम लोक आहेत. येथे जुहापुरा हा भाग सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्येचा आहे. या मतदारसंघातून यंदा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तथापि, गुजरातमधील लोकसभा मतदारसंघांपैकी भरूच मतदारसंघात सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या आहे. येथे 15.64 लाख मतदारांपैकी 22 टक्‍के मतदार मुस्लीम आहेत. अहमदाबाद पश्‍चिम मतदारसंघात 15 टक्‍के मतदार मुस्लीम आहेत.

गुजरातमध्ये 2014 पर्यंतच्या लोकसभा निवडणुकांचा इतिहास पाहिला तर 2014 पर्यंत राष्ट्रीय पक्षांपैकी कॉंग्रेसने केवळ 15 मुस्लीम उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेले होते. भाजपाने तर आतापर्यंत एकाही मुस्लीम उमेदवाराला गुजरातमधून उमेदवारी दिलेली नाही. यंदा कॉंग्रेसने भरुच मतदारसंघातून मुस्लीम उमेदवाराला तिकीट दिले आहे.

कॉंग्रेसने 1962 ते 1989 या काळात 8 मुस्लीम उमेदवारांना रिंगणात उतरवले होते. तथापि, यापैकी केवळ अहमद पटेलच विजयी होऊ शकले. त्यांनी 1977, 1982 आणि 1984 मध्ये विजय मिळवला होता. 1989 नंतर कॉंग्रेसने सात उमेदवारांना तिकीट दिले आहे. सेंटर ऑफ सोशल स्टडीजच्या किरण देसाई यांच्या मते, गुजरातमध्ये मुस्लीम समाज सामाजिकच नव्हे तर राजकीय- दृष्ट्याही पिछाडीवर आहेत. 2002 मधील दंगलींनंतर तर ही स्थिती आणखी गंभीर बनली आहे.

या सर्व पार्श्‍वभूूमीवर यंदाची निवडणूूक महत्त्वाची ठरणार आहे. विशेषतः गांधीनगर मतदारसंघातून आजवर लालकृष्ण आडवाणी हे विजयी होत राहिले. आडवाणींचे मताधिक्‍यही मोठे असायचे. आता यावर्षी अमित शहांना किती मते मिळतात हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. अशाच प्रकारे भरुचमध्येही कॉंग्रेसने ध्रुवीकरणाच्या उद्देशाने मुस्लीम उमेदवार रिंगणात उतरवला आहे खरा; पण निकालांनंतरच ही चाल यशस्वी झाली की नाही हे समजणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)