गुजरात मध्ये एक अश्लिल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दिसणारा व्यक्ती भारतीय जनता पक्षाचे खासदार परबत पटेल असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे येथील राजकीयवातावरण ढवळून निघाले आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओचा फोटो दाखवून आम आदमी पक्षाच्या एका नेत्याने दावा केला की तो १५ ऑगस्टला संपूर्ण व्हिडिओ समोर आणणार आहे. मात्र त्याआधी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
खासदार परबत पटेल यांनी हा व्हिडीओ कोणाचा षड्यंत्र असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या मुलाने याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या प्रकारामुळे गुजरातमधील राजकारणात खळबळ उडाली आहे.
बनासकांठाचे आम आदमी पक्षाचे नेते माधाभाई पटेल यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती. त्यामध्ये त्यांनी एक फोटोही शेअर केला होता. त्यांनी या पोस्ट मध्ये लिहिले होते की खासदार परबत पटेल पालनपूरच्या शासकीय अतिथीगृहात अश्लिल चाळे करताना पकडले गेले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या भाजप नेत्याचा संपूर्ण व्हिडिओ १५ ऑगस्ट रोजी त्यांच्या फेसबुक पेजवर पोस्ट करतील. मात्र त्याआधीच हा प्रकार घडला आहे.
खासदार परबत पटेल या संदर्भात बाजू मांडताना म्हणाले की, व्हिडिओबद्दल आपल्याला जास्त माहिती नसून आक्षेपार्ह आणि अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेलिंग आणि बदनामी करण्याच्या हेतूने कोणत्यातरी व्हिडिओशी छेडछाड करून तयार करण्यात आला आहे. “मी माझ्या आयुष्यात कधीही कोणतेही वाईट काम केले नाही. माझा फोटो एडिट करून तेथे लावला गेला असल्याची शक्यता आहे.”
दरम्यान, पोलिसांनी अश्लील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या एकाला अटक केली आहे अशी माहिती बनासकांठाचे पोलीस उपअधीक्षक पी एस चौधरी यांनी दिली आहे.