कोनाक्री (गिनीया) : गिनीयाच्या दक्षिणेकडील फुटबॉल स्टेडियाममध्ये झालेल्या अभूतपुर्व चेंगराचेंगरीमध्ये ५६ जण ठार झाले आहेत. सामना खेळणाऱ्या संघांच्या चाहत्यांमध्ये झालेल्या बाचाबाचीतून या चेंगराचेंगरीला सुरुवात झाली होती, असे गिनीया सरकारने म्हटले आहे. रविवारी झालेल्या या चेंगराचेंगरीला जबाबदार असलेल्यांचा प्रशासनाकडून शोध घेतला जातो आहे, अशी माहीती आणि प्रसारण मंत्री फाना सौमाह यांनी सरकारी वृत्तवाहिनीवरून दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.
या चेंगराचेंगरीमध्ये मरण पावणाऱ्यांमध्ये काही लहान मुलांचाही समावेश आहे, तर काही जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, असे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे. गिनीयातील महान लष्करी नेते मामादी दौम्बोया यांच्या सन्मानार्थ झेरेकोरे शहरामध्ये झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये लाबे आणि झेरेकोरे संघ आमने सामने उतरले होते, असे गिनीयाचे पंतप्रधान अमादौ ओरी बाह यांनी एक्सवरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
चेंगराचेंगरीमध्ये मरण पावणाऱ्यांची ओळख पटवण्यात आली आहे. फुटबॉलप्रेमींमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असेही बाह यांनी म्हटले आहे.
चेंगराचेंगरीला सुरुवात झाल्यावर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी गर्दीला पांगवण्यासाठी बळाचा वापर सुरू केला. पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केल्यावर फुटबॉल प्रेमींमध्ये अधिकच धावपळ सुरू झाली. यामुळे संतप्त झालेल्या प्रेक्षकांनी पोलिसांवर दगडफेक करायला सुरुवात केली. लोकांनी स्टेडियममधझून बाहेर पडण्यासाठी कुंपणावरून उड्या मारल्या.
स्पर्धेच्या आयोजनावर विरोधकांची टीका
स्पर्धेच्या आयोजनावर विरोधकांच्या आघाडीने जोरदार टीका केली आहे. लष्करी नेत्याच्या राजकीय महत्वाकांक्षेला बेकायदेशीर आणि अयोग्य पद्धतीने पाठिंबा मिळवण्यासाठीच ही फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची टीका विरोधकांनी केली आहे. गिनीयामध्ये २०२१ मध्ये सैन्याने बंड करून अध्यक्ष अल्फा कोंडे यांचे सरकार उलथवून टाकले होते. तेंव्हापासून गिनीयामध्ये लष्करी राजवट आहे.