भाग्यश्री माने खून प्रकरणातील गुन्हेगार मोकाट 

अंकुश महाडिक

सणबूर – गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने प्रयत्न करून देखील पोलीस प्रशासनास निष्पाप भाग्यश्री मानेच्या खऱ्या खुन्यास अटक करण्यास यश आलेले नाही. एक गूढ कहाणी बनून राहिलेल्या या प्रकरणाचा शेवट काय होणार? खऱ्या खुन्यास अटक होणार का ? या खुनाच्या निमित्ताने या विभागात निर्माण झालेले भीतीचे वातावरण कधी कमी होणार? पोलीस प्रशासनाची मलिन झालेली प्रतिमा कधी सुधारणार? यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे येणार काळच देईल.

पाटण तालुक्‍यातील करपेवाडी सारख्या सुशिक्षित गावामधील भागश्री सारख्या गरीब कुटुंबातील महाविद्यालयीन युवतीची निर्घृण हत्या होऊन आज तीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला असला तरी पोलीस प्रशासनास खऱ्या खुन्यास अटक करणे शक्‍य झालेले नाही. केवळ ऐकीव माहितीचे आधारे संशयित म्हणून मृत मुलीच्या पित्यास अटक करण्याव्यतिरिक्त काहीच हाती लागलेले नाही. त्यातच अटक केलेल्या संशयिताने गुन्ह्यातील आपला सहभाग स्पष्ट नाकारल्याने तर पोलिसांचेवर मोठी नामुष्कीची वेळ आली आहे. तीन महिन्याच्या कालावधीमध्ये पोलीसांनी अनेक अंगानी तपास केला. कधी तिच्या बरोबरच्या मैत्रिणींची चौकशी केली, कधी कुटुंबातील आई-वडील शिवाय इतर नातेवाईक यांची केली, तर कधी अंधश्रद्धेचा बळी गेल्याच्या संशयाचे अनुषंगाने विभागातीलच नव्हे तर कर्नाटकातील अनेक भोंदू बाबांची सुध्दा चौकशी केली.

परंतु हाती काहीच आले नाही मुळात भाग्यश्रीचे खुनाचा घटनाक्रम पाहता हा खून अत्यंत शांत डोक्‍याने नियोजनबध्द केलेला दिसतो. त्याचबरोबर ज्याठिकाणी भाग्यश्रीचा मृतदेह सापडला, त्याठिकाणी तिचा खून झालाच नाही. कारण त्याठिकाणी कोणताच पुरावा पोलिसांचे हाती लागला नाही, याचा अर्थ खुनाची जागा दुसरीच आहे. जी पोलीस आजमितीलाही शोधू शकलेले नाहीत. याशिवाय मृतदेहाचे निरीक्षण केले असता तिच्या गळ्या व्यतिरिक्त इतर शरीरावर कुठेही इजा अथवा जखमा दिसून आल्या नाहीत. ना अंगावरती रक्ताचे डाग शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्‍टरांचे मतानुसार शवविच्छेदनाचे अगोदर किमान 12-24 तास तिचा खून झाल्याचे निदर्शनास येते. याचा अर्थ खून मध्यरात्री झाला असणार हे निश्‍चित आहे. म्हणजेच मुलगी रात्री घरातून गायब कशी झाली आणि दुसऱ्या दिवशी दुपार पर्यंत घरातील लोक शांत का होते.

अजून एक शंका येण्यासारखे म्हणजे भाग्यश्री सकाळी एकटीच कॉलेजला गेलेली होती. दुपारपर्यंत आली नाही, म्हणून तिचा शोध घेतला असता तिचा मृतदेह ऊसाचे शेतात आढळून आला. तोही तिच्या घरातील व्यक्तींनाच. या गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे. कुठे तरी संशय येण्यासारखी परिस्थिती नक्कीच आहे. ज्यावेळी तिचा खून झाला त्या दरम्यानचा कालावधी पाहता खूनाचे आदल्या दिवशी पौर्णिमा होती आणि नरबळी बुवाबाजी प्रकारात पौर्णिमेला खूप महत्त्व असते आणि भागश्रीच्या कुटुंबाची पार्श्वभूमी पाहता हे कुटुंब कर्मठ अंधश्रध्दाळू असल्याचे समजते. त्यामुळे

या खूनामागे अंधश्रध्दा असण्याची फार मोठी शक्‍यता आहे, याची उखल होणे गरजेचे आहे. त्याच अनुषंगाने पोलिसांनी तपास करणे गरजेचे आहे. याशिवाय पीडीत कुटुंबाला विश्वासात घेऊन त्यांचेवर कोणाचा दबाव आहे का? या अनुषंगाने सुध्दा तपास करणे गरजेचे आहे. पोलीस प्रशासन प्रामाणिकपणे आपले काम करत आहे हे नक्की पण एक सामाजिक बांधीलकी म्हणून आपण सुध्दा त्यांना सहकार्य करणे गरजेचे आहे. त्याशिवाय भाग्यश्रीच्या खुन्यास अटक करणे शक्‍य नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.