पुणे (प्रभात वृत्तसेवा ) – करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर येणारा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे. त्याबाबतच्या 12 मार्गदर्शक सूचना शनिवारी राज्य सरकारने जारी केल्या. उपनगरांसह मुंबई शहर, ठाणे आणि पुणे शहरासाठी हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. यामध्ये घरगुती गणेश मूर्तींवर दोन फुटांची तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तींना चार फुटांची मर्यादा घातली आहे. याशिवाय शक्यतो सजावट आणि भपकेबाजी टाळावी तसेच विसर्जन घरी करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
करोना साथीच्या पार्श्वभूमी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राज्यातील गणेशोत्सव मंडळासोबत बैठका घेतल्या होत्या. त्यात झालेल्या चर्चेनुसार राज्य सरकारने उत्सवासाठी काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. गृहविभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी हे आदेश जारी केले आहेत.
अशा आहेत मार्गदर्शक सूचना –
1) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना महापालिका आणि स्थानिक प्रशासनाच्या धोरणानुसार आवश्यक पूर्व परवानग्या घ्यावा लागतील.
2) उत्सवाचे मंडप हे न्यायालयाचे आदेश आणि प्रशासनाच्या धोरणाशी सुसंगत असावे. उत्सव साध्या पद्धतीने करणे अपेक्षित असल्याने सार्वजनिक गणपतींच्या सजावटीत भपकेबाजी नसावी.
3) गणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळांसाठी चार फूट तर घरगुती गणेशमूर्ती दोन फुटांच्या मर्यादेत असावी.
4) शक्यतो घरातील धातू/संगमरवर आदी मूर्तींचे पूजन करावे. मूर्ती पर्यावरणपूरक असल्यास विसर्जन शक्यतो घरीच करावे. ते शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रिम तलावात विसर्जन करावे. गणेशमूर्तींचे विसर्जन पुढे ढकलणे शक्य असल्यास माघी गणेशोत्सव विसर्जनावेळी किंवा 2021 च्या भाद्रपद महिन्यात पुढील विसर्जनावेळी करता येणे शक्य आहे. जेणेकरून विसर्जनाची गर्दी टाळता येईल.
5) सार्वजनिक उत्सवासाठी वर्गणी/देणगी स्वेच्छेने मिळत असल्यास घ्यावी. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही हे पाहावे. जाहिराती आरोग्यविषयक किंवा सामाजिक संदेश देणाऱ्या जाहिराती प्रदर्शित करण्याला पसंती द्यावी.
6) सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक सामाजिक उपक्रम जसे की रक्तदान शिबिरे वगैरे घेण्याला प्राधान्य द्यावे.
7) आरती, भजन, कीर्तन आणि अन्य धार्मिक कार्यक्रम करताना गर्दी होणार नाही याची खबरदारी घ्यावी. ध्वनीप्रदूषणाच्या नियम आणि तरतुदींचे पालन करावे.
8) श्रीगणेशाचे दर्शन ऑनलाइन, केबल, फेसबुक आणि वेबसाइटद्वारे करून देण्याची व्यवस्था करावी. जेणेकरून दर्शनासाठी जागेवर गर्दी होणार नाही.
9) मंडपामध्ये निर्जंतुकीकरण आणि थर्मल स्क्रिनिंगची पुरेशी व्यवस्था करावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेणारे भाविक मास्क, सॅनिटायझर आणि सामाजिक अंतराचे नियम पाळतील हे विशेषत्त्वाने पहावे.
10) गणेशाचे आगमन आणि विसर्जनाची मिरवणूक काढण्यात येऊ नये. विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करावी. लहानमुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी विसर्जनस्थळी येणे टाळावे. चाळ, गृहनिर्माण संस्था येथील सर्व घरगुती मूर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्र काढू नये.
11) महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीनं कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात यावी
12) राज्य सरकारच्या पोलीस, महापालिका प्रशासन आणि अन्य संबंधित विभागांनी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी घालून दिलेल्या नियमाचे पालन करणे बंधनकारक राहील. याशिवाय सण सुरू होण्याच्या मधल्या काळात ज्या आणखी सूचना प्रसिद्ध केल्या जातील त्याचेही पालन करणे बंधनकारक राहील.