भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीसंबंधी राज्य शासनाकडून मार्गदर्शक सुचना जारी; जाणून घ्या नियम

मुंबई – दरवर्षीप्रमाणे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यावर्षी दि. 14एप्रिल, 2021 रोजी साजरी केली जाणार आहे. सध्या कोविड- 19 च्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेल्या अति संसर्गजन्य परिस्थितीचा व वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येचा विचार करता या वर्षी भारतरत्नडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने राज्य शासनाकडून मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

मार्गदर्शक सूचना

1) सकाळी 7.00 वाजेपासून सायंकाळी 8.00 वाजेपर्यंत जयंती साधेपणाने साजरी करावी.

2) करोना संसर्गाचा विचार करता दर वर्षीप्रमाणे प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका यावेळी जयंती निमित्ताने काढण्यास मनाई आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना त्या ठिकाणी अनुयायांची संख्या एका वेळी पाच पेक्षा जास्त नसावी. तसेच तेथे सोशल डिस्टन्सिंगचे व स्वच्छतेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे (मास्क, सँनिटायझर इत्यादी) पालन करून जयंती साजरी करण्यात यावी. तथापि, चैत्यभूमी, दादर, मुंबई येथे भारतरत्न डॉ. आंबेडकर यांना शासकीय मानवंदना देण्यासाठी राज्यपाल, मुख्यमंत्री व इतर मान्यवर उपस्थित राहाणार असल्याने सदर कार्यक्रमासाठी 50 पर्यंत व्यक्ती उपस्थित राहू शकतील. तसेच दीक्षाभूमी नागपूर येथील कार्यक्रमासाठी 50 पर्यंत व्यक्ती उपस्थित राहू शकतील. कोविड-१९ विषाणूच्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमी, दादर, मुंबई येथे तसेच महाराष्ट्रातील अन्य रेल्वे स्थानकावरही गर्दी करण्यास निर्बंध असल्याने शासनातर्फे जयंतीनिमित्त चैत्यभूमी, दादर, मुंबई येथील कार्यक्रमाचे दुरदर्शनवरुन थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याने सर्व अनुयायींनी चैत्यभूमी, दादर, मुंबई येथे न येता घरातुनच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे.

3) यावर्षी कोविङ-19 विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहाता सार्वजनिक ठिकाणी गाणी, व्याख्याने, पथनाट्य इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन जयंती निमित्ताने करण्यात येऊ नये. त्याऐवजी सदर कार्यक्रमाचे केबल नेटवर्कदारे अथवा ऑनलाईन प्रक्षेपण उपलब्ध करून देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी.

4) जयंती दिनी आरोग्यविषयक उपक्रम / शिबिरे (उदा. रक्तदान) स्थानिक प्रशासनाच्या पुर्वानुमतीने आयोजित करता येतील आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करता येईल. तथापि आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.

5) राज्यातील कोविड-189विषाणुचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेचया परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष जयंती दिनाचा कार्यक्रम सुरू होण्याच्या मधल्या कालावधीत शासन स्तरावरुन आणखी काही मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचेदेखील अनुपालन करावे, अशी माहिती राज्य शासनाकडून देण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.