पुणे – “जी-20′ बैठकीसाठी आलेल्या प्रतिनिधींनी बुधवारी शहरातील वारसास्थळांना भेट दिली. शनिवारवाडा, लाल महाल, आगाखान पॅलेस आदी ठिकाणी त्यांनी भेट दिली. तसेच इतिहासही जाणून घेतला.
सकाळी शनिवारवाड्यापासून या भेटीला सुरूवात झाली. शनिवारवाड्याची भव्यता, प्रवेशद्वार, विस्तारलेला परिसर प्रतिनिधींनी आपल्या मोबाइलमध्ये टिपला. लाल महल येथे पारंपरिक चौघड्यांच्या सुरावटीत पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. जिजाऊसाहेब आणि बाल शिवाजी महाराजांचा पुतळा पाहिल्यानंतर त्यामागचा इतिहासही त्यांनी जाणून घेतला. महालातील छायाचित्रेही त्यांनी आपल्या मोबाइलमध्ये टिपली. भेटीच्या अखेरच्या टप्प्यात प्रतिनिधींनी नाना वाडा येथे भेट देऊन तेथील इतिहास जाणून घेतला. अजित आपटे आणि संदीप गोडबोले यांनी पाहुण्यांना पुण्याचा इतिहास आणि वारसा स्थळांबाबत माहिती दिली.
यावेळी पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पाहुण्यांचे आभार मानले. यावेळी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उपविभागीय अधिकारी संतोष देशमुख, पर्यटन विभागाच्या सहायक संचालक सुप्रिया करमरकर, वारसास्थळ जतन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत दळवी आदी उपस्थित होते.
आगाखान पॅलेस येथेही भेट
दरम्यान, पुण्यात आलेल्या जी-20 प्रतिनिधींनी आगाखान पॅलेसला ही भेट देऊन महात्मा गांधीजी यांच्या जीवनाविषयी माहिती घेतली. त्यांनी गांधीजींचे बालपण, कस्तुरबा गांधींचे जीवन, आगाखान पॅलेस येथील गांधीजींचे वास्तव्य याबाबत माहिती विचारली. नीलम महाजन यांनी त्यांना याबाबत तसेच पॅलेसचे ऐतिहासिक महत्व याविषयी माहिती दिली. यावेळी पाहुण्यांनी चरख्याविषयीही माहिती जाणून घेतली.