जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चर्चा करूनच करणार नेमणूक
पुणे – राज्य शासनाने मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचे अधिकार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांना दिले आहेत. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांशी चर्चा करून या नेमणुका करायच्या आहेत. त्यामुळे संबंधित गावातील पालकमंत्र्यांच्या कार्यकर्त्याचीच या पदावर वर्णी लागणार आहे.
पुणे जिल्ह्यात डिसेंबर 2020 पर्यंत ग्रामपंचायतींची मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या 750 आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींवर लवकरच प्रशासक नेमले जाणार आहेत. दरम्यान, यापूर्वी ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून ग्रामविस्तार अधिकारी यांची नियुक्ती होत होती. आता यामध्ये राज्य शासनाने अधिनियमात बदल केला असून ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून योग्य व्यक्तीची नेमणूक करता येईल, अशी सुधारणा केली आहे.
नैसर्गिक आपत्ती, आणीबाणी, युद्ध, वित्तीय आणीबाणी, प्रशासकीय अडचणी किंवा महामारी यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेणे शक्य झाले नसेल. तर राज्य शासनास पंचायतीचा प्रशासक म्हणून योग्य व्यक्तीची नियुक्ती करता येणार आहे.
कार्यवाही करण्याच्या सूचना
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून योग्य व्यक्तीची नियुक्ती संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या सल्ल्याने करणार आहेत. प्रशासक म्हणून नियुक्ती केल्यानंतर ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज सुरळीत सुरू राहील, या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना शासनाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या आहेत.
पदावरून दूर करण्याचे अधिकार…
मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर ज्या व्यक्तीची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात येईल, अशा व्यक्तीकडून आपली कर्तव्ये पार पाडताना झालेल्या गैरवर्तणुकीबद्दल किंवा कोणत्याही अपमानास्पद वर्तणुकीबद्दल अथवा कर्तव्यात दुर्लक्ष केल्याबाबत सदर व्यक्तीस पदावरून दूर करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना राहणार आहेत.
…तर ग्रामविकास विभाग घेणार निर्णय
ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारचा वाद किंवा तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास त्यावर अंतिम निर्णय राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून घेण्यात येणार आहे.
तालुका आणि प्रशासक नेमण्यात येणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या
हवेली (55), आंबेगाव (30), बारामती (49), भोर (74), दौंड (50), इंदापूर (61), जुन्नर (67), मावळ (57), मुळशी (45), पुरंदर (66), खेड (91), शिरूर (73), वेल्हे (31)