पुण्याच्या पाणीटंचाईला पालकमंत्रीच जबाबदार

कॉंग्रेस नेते मोहन जोशी यांचा आरोप : शहरात कृत्रिम पाणीटंचाई असल्याचाही दावा

पुणे – शहरातील कृत्रिम पाणी टंचाईला पालकमंत्री गिरीश बापट हेच जबाबदार आहेत. त्यांचेच हे महापाप आहे, असा आरोप कॉंग्रेस नेते मोहन जोशी यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत केले. बारामती लोकसभा मतदार संघातील भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांना मतदान व्हावे, यासाठी त्यांनी कालव्यातून भरपूर पाणी सोडले, अशी टीकाही यावेळी करण्यात आली.

यावेळी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, अभय छाजेड, संजय बालगुडे, रमेश अय्यर आदी मान्यवर उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपासून शहरातील पाणी पुरवठा विस्कळित झाला आहे. शहरातील पाणी पुरवठ्यात कपात करण्याचे प्रयत्न महापालिका आणि पाटबंधारे खात्याकडून सुरू आहेत. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा पाणी साठा होता. त्यांचे नियोजन पालकमंत्र्यांना करता आले नाही. त्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळेच पुणे शहरात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे. शिवाय कुल यांना दौंड भागात मतदान व्हावे, यासाठीच त्यांनी पुणे शहराला वेठीस धरून कालव्यातून भरमसाट पाणी सोडल्याचा आरोपही जोशी यांनी यावेळी केला.

“मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आणि भाजपच्या उमेदवार प्रज्ञासिंग ठाकूर यांनी तत्कालीन एसटीएस अधिकारी आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त धरमवीरसिंग यांच्यावर मारहाणीचे आरोप केले आहे. त्यावर प्रज्ञासिंग यांनी महाराष्ट्र पोलिसांविरुद्ध तक्रार दिल्यास आपण कारवाई करू, असे मुख्यमंत्री म्हणाले होते. त्यानुसार आता धरमवीरसिंग आणि अधिकाऱ्यांना अटक करून दाखवावी,’ असे आव्हान यावेळी संजय बालगुडे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.

ईव्हीएममुळे प्रशासनावर आरोप
मतदानाच्या दिवशी वडगावशेरी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयात तीन वेळा मशीन बंद पडले. त्यामुळे त्या ठिकाणी मतदानाची वेळ वाढवावी, अशी मागणी आम्ही प्रशासनाकडे केली होती. परंतु वेळ वाढून देण्यात आली नाही. यावरून प्रशासन भाजपच्या फायद्यासाठी काम करीत होते की काय, अशी शंका निर्माण झाल्याचा आरोपही जोशी यांनी केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.