पालकमंत्री पुणे शहरातील, की बाहेरचा?

पुणे – खासदारपदी निवडून आल्याने पालकमंत्री गिरीश बापट यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. परिणामी पालकमंत्री पद आणि त्यांच्याकडे असलेली अन्य खाती हे देखील रिक्‍त होणार आहे. त्यामुळे त्या जागी कोणाची निवड होणार याबाबत उत्सूकता आहे.

आजपर्यंत पुण्याचा पालकमंत्री हा पुण्याचा कारभारी राहिला आहे. त्यामुळे हे पद पुण्यातीलच आमदाराला मिळेल की बाहेरून आयात करावा लागणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. ऑगस्टमध्येच विधानसभेची आचारसंहिता लागण्याची शक्‍यता असल्याने तीन महिन्यांसाठीच हे पद असणार आहे.

पुण्यामध्ये आठ आमदार भाजपचे आहेत. त्यातील बापट खासदार झाल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागणार आहे. गॅझेट झाल्यानंतर पंधरा दिवसांच्या आत कायद्यानुसार त्यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. पुण्यात बापट आणि मिसाळ हे दोघे सोडले तर अन्य आमदारांची पहिलीच टर्म आहे. त्यामुळे त्यांना हे पद मिळण्याची शक्‍यता कमीच आहे. बापट यांच्याकडे पुणे आणि पिंपरी-चिंचवडची देखील जबाबदारी आहे. पार्थ पवार आणि श्रीरंग बारणे या लढाईत पिंपरीचे आमदार बाळा भेलके यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. त्यामुळे त्यांचा विचार यासाठी केला जाऊ शकतो, अशी शक्‍यता आहे.

दुसरीकडे गिरीश महाजन याच्याकडे पुण्याचे पालकमंत्रीपद देण्याची चर्चा राज्यपातळीवर सुरू झाली आहे. मात्र, महाजन यांचे पुण्याशी असलेले पाणी विषयातील सख्य पाहता, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांना पालकमंत्रीपद दिले जाणार का, याविषयीही शंका निर्माण झाली आहे.

पुण्याचा तीन महिन्यांसाठीचा कारभारी जूनमध्ये ठरणार
तीन महिन्यांसाठीचा पुण्याचा कारभारी कोण याचा फैसला जूनच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्‍यता आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात बापट राजीनामा देतील आणि विधानसभेत त्यांना निरोप देण्यात येईल. त्याचवेळी रिक्‍त झालेली मंत्रीपदे आणि पालकमंत्रीपदही भरले जाईल किंवा अन्य मंत्र्यांना त्याचे अतिरिक्‍क कार्यभार देण्यात येईल. याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी आणि मुख्यमंत्री घेतील, असे बापट यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here