सुप्रिया सुळेंच्या पुढाकाराने स्वीकारले मुलीचे पालकत्व
बीड: मुलगी झाली म्हणून नकोशी वाटणाऱ्या मुलीला सोडून पलायन करण्याचे सत्र अद्यापही सुरू आहे. बीड येथील रेल्वे ट्रॅकजवळ काटेरी झुडुपात कोणीतरी नवजात मुलीला टाकून गेले होते. यावेळी महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना ही गोष्ट कळताच त्यांनी तडक या मुलीला वैद्यकीय उपचारांसाठी दवाखान्यात दाखले केले. या मुलीचे पालकत्व स्वीकारले. यावेळी सुप्रियाताई सुळे पुढाकाराने धनंजय मुंडे यांनी मुलीवरील उपचार, शिक्षण आणि लग्नासहित तिची संपूर्ण जबाबदारी स्वीकारून सामाजिक मान जपले.
खरं तर आज मुली प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असल्या तरी समाजात स्त्री-भृणहत्या सर्रास होत आहेत. प्रगतीकडे वाटचाल करणाऱ्या महाराष्ट्रात आज मुलींचे प्रमाण दिवसें दिवस कमी होत आहे ही चिंतेची बाब आहे. दरम्यान धनंजय मुंडे यांनी संवेदनशीलता दाखवत या मुलींचा सांभाळ करण्याची तयारी दाखवली. मुलगी जन्माला आली की तिला अनाथ आश्रम वा कचऱ्याच्या पेटीजवळ सोडून जाणाऱ्या पालकांचे सामाजिक परिवर्तन घडून आले तर निशिचतच सावित्रिच्या लेकींचा खऱ्या अर्थाने सन्मान होईल.
धनंजय मुंडे यांनी व्यक्त केल्या भावना
शिवकन्या सुखरूप असावी यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचेच आभार. बाल संगोपन समिती व वैद्यकीय विभागांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत ते सर्व काळजी घेत आहेत. या गोंडस शिवकन्येचे पालकत्व सुप्रियाताई सुळे आणि मी स्वीकारले आहे. या लहानशा परीचा बाप बनण्याचा आनंद आहेच मात्र इतकी घृणास्पद घटना आपल्या समाजात घडतेय याचे मला दुःख होत आहे. नुकताच जन्म झालेल्या बाळाला वाऱ्यावर सोडणाऱ्यांना कठोर शासन होईल.
‘मुलगा मुलगी एक समान’ फक्त असे नारे देऊन समता प्रस्थापित होत नसते. आपल्या आचरणात ती समता यायला हवी. आज कितीतरी शिवकन्या जन्माला येताच अस्तित्वाची लढाई लढत आहेत. हा दुर्दैवी प्रकार पुन्हा घडू नये यासाठी आपण पुढे आले पाहिजे. समाज म्हणून आपली ती जबाबदारी आहे. शिवकन्यारुपी लक्ष्मीचा सांभाळ आपण सारे मिळून करू.