पालकमंत्री बाळासाहेब पाटीलांचे वर्चस्व वाढले; पुसेसावळी जि. प. गटातील ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचा झेंडा

पुसेसावळी – पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील निवडणूक झालेल्या पुसेसावळी, पारगाव, वडगाव (ज. स्वा.), चोराडे, गोरेगाव वांगी, उंचीठाणे, लाडेगाव, रहाटणी या ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा फडकला आहे. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे या गटातील वर्चस्व वाढले आहे.

खटाव पंचायत समितीचे माजी उपसभापती चंद्रकांत पाटील, सुरेशबापू पाटील, सचिनदादा कदम यांच्या नेतृत्वाखाली पुसेसावळीत श्री जय हनुमान ग्रामविकास पॅनेलने सर्वच्या सर्व, म्हणजे 15 जागा जिंकून सत्तांतर घडवले. या पॅनेलने निर्ववाद वर्चस्व प्रस्थापित करण्याचा इतिहास घडवला.

गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत आरक्षित जागेवरील उमेदवार पराभूत झाल्याने या पॅनेलला सत्तेपासून दूर रहावे लागले होते. ती कसर पॅनेलने सव्याज भरून काढली. आता पूर्ण सत्ता हाती आल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गोटात जल्लोषाचे वातावरण आहे.

पारगाव येथे श्री भैरवनाथ पारेश्वर ग्रामविकास पॅनेलला लढत देण्यासाठी काहींनी स्वतंत्र पॅनेल टाकले होते; परंतु राष्ट्रवादीप्रणित भैरवनाथ पारेश्वर पॅनेलने विरोधकांचा धुव्वा उडवून 7-0 अशी सत्ता हस्तगत केली. सह्याद्री कारखान्याचे संचालक व सरपंच संतोष घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकृष्ण पॅनेलने जयरामस्वामींचे वडगाव येथे सर्व 11 जागा जिंकून विरोधकांना भुईसपाट केले. चोराडे येथे सुहास पिसाळ यांच्या मार्गदर्शनाखालील ज्योतिर्लिंग ग्रामविकास पॅनेलनेही सर्वच्या सर्व 9 जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळवले.

गोरेगाव वांगी येथे धैर्यशील कदम व हिम्मत माने यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने विरोधकांना 9 विरुद्ध 0 अशी धूळ चारून सत्ता मिळवली. उंचीठाणे येथे प्रताप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालील भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलने सर्वाधिक सहा जागा जिंकून सत्ता हस्तगत केली. विरोधकांना केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.

लाडेगाव येथे राष्ट्रवादीचे चार सदस्य आधीच बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित तीन जागांकरिता निवडणूक झाली. त्यामध्ये तिन्ही जागांवर अपक्षांनी बाजी मारली. रहाटणी येथे संभाजी थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहा सदस्य बिनविरोध निवडून आले होते. उरलेल्या एका जागेसाठी निवडणूक होऊन थोरात यांच्याच गटाचा उमेदवार निवडून आल्याने त्यांच्या गटाने 7-0 अशी निर्विवाद सत्ता मिळवली आहे. दरम्यान, वांझोळी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.