अकोला – पालकमंत्री बच्चू कडू यांनी सोमवारी चक्क वेशांतर करून शासकीय कार्यालयाची झाडाझडती घेतली. अकोला शहर व पातूर शहरातील विविध शासकीय कार्यालयांना त्यांनी भेट दिली. एवढेच नव्हे, तर त्यांनी स्वस्त धान्य दुकानांही भेटी देऊन धान्य वितरणात काळा बाजार होत आहे का याबाबत माहिती घेतली.
बच्चू कडू यांनी युसुफखाँ पठाण हे बनावट नाव धारण केले होते. महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये जाऊन त्यांनी पाहणी केली. यावेळी मनपा आयुक्त निमा अरोरा त्यांच्या कक्षात नसल्याने त्यांच्या स्विय सहायकाशी त्यांनी संवाद साधला.
विशेष म्हणजे वेशांतर केलेल्या बच्चू कडू यांना एकाही मनपा कर्मचाऱ्याने ओळखले नाही. मात्र ते निघून गेल्यानंतर पालकमंत्री वेश पालटून आले होते, हे समजताच मनपा परिसरात मोठी खळबळ उडाली होती.