पालकमंत्री अजित पवार आज शहरात

प्राधिकरणाच्या जगताप डेअरी येथील पूलाचे करणार उद्‌घाटन

पिंपरी: (प्रतिनिधी): श्रेयवादात अडकलेला पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचा किवळे-सांगवी फाटा बीआरटीएस रस्त्यावरील जगताप डेअरी चौकातील (साई चौक) पुण्याहून काळेवाडीकडे जाणारा उड्डाणपूल आता शुक्रवारपासून (दि. 29) वाहतुकीसाठी खुला होणार आहे. उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज सकाळी साडेदहा वाजता पुलाचे उद्‌घाटन करण्याचे नियोजन आहे.

मोजक्‍याच अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुलाचे उद्‌घाटन होणार आहे. जगताप डेअरी चौकातील उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे करण्यात आली होती. दरम्यान, महापौर उषा ढोरे व भाजप पदाधिकाऱ्यांनी 9 मार्चला पुलाचे उद्‌घाटन घाईघाईने उरकले. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये श्रेयवाद रंगला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्याचे पत्र देऊनही महापौरांनी राजशिष्टाचार डावलला. पुलाचे काम अपूर्ण असतानाही भाजपने केवळ श्रेयासाठी घाईने उद्‌घाटन उरकले, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसने केला.

तर, संबंधित उड्डाणपुलाचे काम पूर्ण झालेले होते. तसेच पूल सुरू करण्याची मागणी स्थानिक नागरिक तसेच लोकप्रतिनिधी सातत्याने करत होते. पुलाअभावी वळसा पडत असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांची गैरसोय होत होती. त्याचा विचार करूनच पुलाचे उद्‌घाटन केल्याची भूमिका सत्ताधारी भाजपने घेतली. दरम्यान, प्राधिकरणाने पुलाचे काम अपूर्ण असल्याचे कारण पुढे करीत हा पूल राडारोडा टाकून बंद केला. आता या पुलाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्‌घाटन करून पुल वाहतूकीसाठी खुला केला जाणार आहे.

जगताप डेअरी येथील साई चौकात दोन समांतर उड्डाणपुलाचे काम करण्यात आले आहे. काळेवाडीकडून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांच्या सोयीसाठी केलेला पहिला उड्डाणपुल वर्षभरापूर्वी खुला करण्यात आलेला आहे. तर, आता पुण्यावरून काळेवाडीकडे जाणाऱ्या वाहनांच्या सोयीसाठी दुसरा उड्डाणपुल खुला केला जाणार आहे. संबंधित समांतर उड्डाणपुलांच्या कामासाठी 26 कोटी 70 लाख इतकी निविदा रक्कम मंजूर आहे. प्रत्येकी 700 मीटर लांबी आणि 8 मीटर रुंदी असलेल्या या पुलामुळे साई चौकातील वाहतुकीची कोंडी सुटण्यास मदत मिळणार आहे.


“पुण्याहून काळेवाडीकडे जाणाऱ्या वाहनांच्या सोयीसाठी प्राधिकरणाकडून उभारलेल्या उड्डाणपुलाचे शुक्रवारी (दि. 29) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात येणार आहे. पुलाचे उद्‌घाटन झाल्यानंतर वाहतुकीसाठी पूल खुला केला जाणार आहे. संबंधित पुलामुळे किवळे-सांगवी फाटा बीआरटीएस रस्त्यावरील वाहतूक विनाअडथळा होण्यास मदत मिळणार आहे.”
– प्रमोद यादव, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राधिकरण.

Leave A Reply

Your email address will not be published.