तुंबणाऱ्या पाण्यावर महापालिकेचा खडा पहारा

स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याचे आदेश

पावसाचेही ठेवणार रेकॉर्ड

महापालिकेकडून प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात पावसाच्या मोजणीसाठी यंत्रे बसविण्यात आली आहेत. ही यंत्रणा सुरू असून या यंत्रणेमुळे प्रत्येक तासाला पडलेल्या पावसाची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागास एसएमएसद्वारे मिळते. या माहितीचा आधार घेऊन ज्या भागात पावसाचे प्रमाण जास्त असेल त्या भागावर पथ विभागाकडून लक्ष केंद्रीत केले जाणार असल्याचेही पावसकर यांनी स्पष्ट केले.

पुणे – शहरात पावसाळ्यात रस्त्यावर वारंवार पाणी साठणाऱ्या ठिकाणी महापालिकेकडून स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती केली जाणार आहे. अशा ठिकाणांवर पाणी तुंबल्यानंतर वाहतुकीचा होणारा खोळंबा तसेच नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन तुंबलेल्या पाण्याचा निचरा करण्याची जबाबदारी या कर्मचाऱ्यांवर देण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख अनिरूद्ध पावसकर यांनी दिली.

दरम्यान, अशा ठिकाणांची यादी करून तातडीने पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचनाही क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आल्या आहेत. शहरात गेल्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात झाली आहे. गुरुवारी 24 तासांत सुमारे 74 मिमी पावसाची नोंद झाली असून गेल्या 9 वर्षांतील 24 तासांतील हा सर्वाधिक पाऊस आहे. या पावसामुळे शहरातील सखल भागात अनेक ठिकाणी पाण्याची तळी साचली होती.

महापालिकेकडे शहरात सुमारे 40 ते 45 ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या ठिकाणच्या पाण्याचा निचरा करण्यात आलेला असला तरी, या प्रकारानंतर पथ विभागाकडून क्षेत्रीय कार्यालयांना तातडीने आपल्या भागातील अशा पाणी तुंबणाऱ्या जागांची निश्‍चिती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. अशा ठिकाणी तातडीने उपाययोजना हाती घेण्यासह अशा ठिकाणी एक स्वतंत्र कर्मचारी पावसाळ्याच्या काळात नेमण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहे. पावसाच्या कालावधीत हा कर्मचारी संबंधित ठिकाणी उपस्थित राहून तातडीने पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना करू शकेल तसेच आवश्‍यकता भासल्यास त्याला इतर कर्मचारी तसेच आवश्‍यक साहित्याची मदतही करता येणार आहे. त्यामुळे तातडीने कर्मचारी नेमण्याच्या सूचना देण्यात आल्याचे पावसकर यांनी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.