शेतकऱ्यांना हवी भावाची हमी; काबाडकष्टाने पिकविलेला शेतीमाल कवडीमोल

योगेश कणसे
लोणी देवकर
-शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला योग्यभाव मिळत नाही. पर्यायाने शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावे लागते. किमान आधारभूत किंमत शेतमालाला दिली जात असली तरी शेतमालाच्या किमती स्थिर राहाव्यात आणि शेतकऱ्यांना कष्टाचं योग्य फळ मिळावे, यासाठी शेतकऱ्यांकडून किमान आधारभूत किंमतीचा कायदा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

सधन असलेल्या इंदापूर तालुक्‍यात प्रामुख्याने ऊस, डाळिंब, मका आदींसह फळभाज्या आणि पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. इंदापूर तालुक्‍यात निर्यातक्षम द्राक्ष, डाळिंब आणि इतर फळ उत्पादन घेणारा शेतकरीवर्ग मोठ्या प्रमाणात आहे. तसेच दैनंदिन जीवनातील पालेभाज्या आणि फळभाज्यांचे उत्पादन घेणारा देखील विशेष शेतकरीवर्ग इंदापूर तालुक्‍यात मोठ्या संख्येने आहे.

परंतु शेतकऱ्यांनी पिकवलेला शेतमाल योग्य बाजारभावाअभावी अक्षरशः रस्त्यावर फेकून देण्याची वेळ इंदापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांवर आली आहे.उत्पादनावर केलेला खर्च देखील न निघाल्याने एका संतप्त शेतकऱ्याने (दि.29) इंदापुरातील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अक्षरशः गाडी भरून ढोबळी मिरची फेकून दिली. यातून काबाडकष्ट करणारा शेतकरी किती त्रस्त झाला आहे, हेच यातून दिसून येत आहे.

शेतकऱ्यांची मंदी, व्यापाऱ्यांची चांदी
बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणल्या जाणाऱ्या शेतमालाला कवडीमोल दर दिला जात आहे. शेतकऱ्यांकडून कमी किमतीत खरेदी करून व्यापाऱ्यांकडून भावात विक्री केली जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी शेतकऱ्याने क्‍विंटलहून अधिक मिरच्या रस्त्यावर कमी भाव नसल्यामुळे रस्त्यावर फेकून दिल्या होत्या. व्यापाऱ्यांकडून लिलावात लावल्या जाणाऱ्या बोलीमधून शेतकऱ्यांचा वाहतुकीचा खर्चही निघत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची मंदी व्यापाऱ्यांची चांदी, अशी प्रतिक्रिया काही शेतकरी व्यक्‍त करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.