नवी दिल्ली – आधार क्रमांक जोडणाऱ्या उद्योगांना तीनच दिवसात वस्तू आणि सेवा कराच्या नोंदणीला मंजूरी मिळेल, असे अप्रत्यक्ष कराच्या केंद्रीय मंडळाने म्हटले आहे. या संदर्भातील अधिसूचना 21 ऑगस्ट 2020 पासून लागू झाली आहे, असे “सीबीआयसी’ने म्हटले आहे.
जर व्यवसायाने आधार क्रमांक दिलेला नसेल तर व्यवसायाच्या जागेची प्रत्यक्ष पडताळणी केल्यानंतरच जीएसटी नोंदणी दिली जाईल, असे अधिसूचनेत असेही म्हटले आहे.
नवीन करदात्यांच्या आधार प्रमाणीकरणासाठीच्या कृती प्रक्रियेला जीएसटी परिषदेच्या 14 मार्च 2020 रोजी झालेल्या 39 व्या बैठकीमध्ये मंजूरी देण्यात आली आहे, असे अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले. मात्र या कृती प्रक्रियेची अंमलबजावणी कोविड-19 मुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे लांबणीवर टाकण्यात आली होती.
नवीन जीएसटी प्रमाणीकरणासाठी आधार प्रमाणीकरण करू इच्छिणाऱ्या व्यक्तीच्या अर्जाला उद्योगाचे ठिकाण, पूर्तता केलेल्या कागदपत्रांच्या प्रत्यक्ष पडताळणीनंतरच मंजूरी दिली जाईल. ही पडताळणी करण्यासाठी कामाचे 21 दिवस अथवा जर नोटीस जारी झाली तर त्याहून अधिक कालावधी लागू शकतो. असे सूत्रांनी सांगितले.