नवी दिल्ली – दिल्लीतील एका बेकायदेशीर पान मसाला उत्त्पादन करणाऱ्या कंपनीची 830 कोटी रूपयांची कर चोरी जीएसटीच्या अधिकाऱ्यांनी उघडकीला आणली आहे. हे पान मसाला उत्पादन करणारे युनिट कोणत्याही रजिस्ट्रेशन शिवाय चालवले जात होते. त्यांनी आपल्या उत्पादनाचे रजिस्ट्रेशन तर केले नाहींच पण त्यावरील जीएसटीही त्यांनी भरला नाहीं.
या युनिट कडून पान मसाला व गुटखा उत्पादने अनेक राज्यांमध्ये विक्रीसाठी पाठवली जात होती. त्यांनी आत्तापर्यंत एकूण 830 कोटी रूपयांचा कर चुकवला आहे असे जीएसटीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. या उत्पादकाचे गोडाऊन, कच्चा माल, मशिनरी आणि अन्य सामग्री जप्त करण्यात आली आहे.
या बेकायदेशीर फॅक्टरीत 65 कामगार काम करीत असल्याचे आढळून आले आहे. तेथील सुमारे 4 कोटी 14 लाखांची सामग्री आणि कच्चामाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून त्यांच्यावरील अन्य कारवाई सध्या सुरू आहे.