जीएसटी, नोटाबंदी, मराठा आरक्षणावर संसदेत चर्चा केली का? 

नरेंद्र पाटील यांचा खा. उदयनराजेंना सवाल

सातारा – जीएसटी अन्‌ नोटाबंदीसारख्या निर्णयावर खा. उदयनराजे टीका करत आहेत. वास्तविक ज्यावेळी संसदेत जीएसटी अन्‌ नोटाबंदीवर चर्चा होत होती, त्या चर्चेमध्ये खा. उदयनराजेंनी किती वेळा सहभाग घेतला? असा सवाल महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर मराठा आरक्षणासाठी छ. संभाजीराजे यांनी संसदेबाहेर आंदोलन केले. खा. उदयनराजेंनी मराठा आरक्षणासाठी चर्चा केली का? त्याचबरोबर प्रतापगडाच्या संवर्धनासाठी तुम्ही काय केले, याचा देखील खुलासा लवकर करा, असे आव्हान नरेंद्र पाटील यांनी दिले.

साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी माधव भंडारी, विक्रम पावस्कर, भरत पाटील, दिपक पवार, एकनाथ ओंबळे, हणमंतराव चवरे आदी उपस्थित होते. पाटील म्हणाले, आजपर्यंत मी अनेक प्रश्‍न उपस्थित केले. मात्र, विद्यमान खासदार उत्तर न देता विषयांतर करित आहेत. मात्र, आता त्यांनी मी उपस्थित करित असलेल्या प्रश्‍नांवर खुलासा करावा. त्यापैकी मागील दहा वर्षात आपली संसदेतील हजेरी किती? किती प्रश्‍न उपस्थित केले? किती तास चर्चेत सहभाग घेतला? हे एकदा प्रसिध्द करा. जीएसटीमुळे कसे नुकसान झाले? ते विधेयक मंजूर होत असताना संसदेत बोललात का? आजपर्यंतचा खासदार निधी कुठल्या तालुक्‍यात किती वितरित केला? निवडणूकीच्या जाहीरनाम्यातील किती आश्‍वासनांची पूर्ती झाली? हे देखील त्यांनी जाहीर करावे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.