GST New Rules 2025: जीएसटी (GST) संदर्भातील महत्त्वाच्या नियमात नवीन वर्षात बदल होणार आहे. 20 कोटी रुपयांपेक्षा जास्त टर्नओव्हर असणाऱ्या व्यवसायांसाठी हा बदल महत्त्वाचा असणार आहे. वर्ष 2025 मध्ये मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन (MFA) अनिवार्य करण्यात आले आहे. हा नवीन नियम काय आहे? याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
E-Way Bill आणि E-Invoicing सिस्टमबाबत नवीन अपडेट जारी करण्यात आले आहे. 20 कोटी रुपयांपेक्षा अधिक टर्नओव्हर असणाऱ्या व्यावसायिकांसाठी मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन (MFA) 1 जानेवारी 2025 पासून लागू होईल. तर 5 कोटींपेक्षा अधिक टर्नओव्हर असणाऱ्यांसाठी हा नियम 1 एप्रिल 2025 पासून लागू होईल. बनावट बिले आणि सुरक्षेच्या दृष्टीने MFA लागू करण्यात आले आहे. चलान तारखेच्या केवळ 360 दिवसांपर्यंत ई-वे बिलाची मुदत वाढवता येईल.
ई-वे बिल म्हणजे नक्की काय?
E-Way Bill म्हणजे इलेक्ट्रॉनिक वे बिल हे एक डिजिटल कागदपत्र असून, याचा उपयोग वस्तू एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी केला जातो. जीएसटी अंतर्गत या बिलाचा उपयोग वस्तू ट्रॅक करण्यासाठी केला जातो. ई-वे बिल 12 आकडी क्रमांकासह येते. याद्वारे वस्तू ट्रॅक करणे सोपे जाते. वस्तूची किंमत 50 हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास हे बिल जनरेट करणे आवश्यक आहे.
ऑनलाइन पद्धतीने हे बिल जनरेट केले जाते. सामानाची ने-आण करताना ई-वे बिल नसल्यास वाहन व माल जप्त केला जाऊ शकतो. तसेच, दंड देखील आकारला जातो.