नागपुर – महाराष्ट्रातील 290 कोटी रूपयांचा आणखी एक जीएसटी घोटाळा उघडकीला आला आहे. जीएसटी इंटेलिजन्सच्या महासंचालकांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की 290 कोटी 70 लाख रूपयांच्या व्यवहारात भ्रष्ट मार्गाने खोटे हिशोब दाखवून 25 कोटी 22 लाख रूपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवण्यात आल्याचेहीं उघडकीला आले आहे.
या प्रकरणी मुंबईतील एम ऍन्ड एम ऍडव्हायजर नावाची एक संस्था आणि कन्सल्टंट प्रा. लि कंपनीच्या कार्यालयांवर छापे टाकण्यात आले. धुळ्यात अस्तित्वात नसलेल्या एका जाहींरात कंपनीच्या नावाने त्यांनी हे व्यवहार करून सरकारची फसवणूक केली आहे. ही कंपनी चित्रपट निर्मात्या संस्थांशी करार करून त्यांच्या विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वाहिन्यावरील प्रसारणाचे हक्क विकत घेत असे.
हे हक्क विकत घेऊन ते दुसऱ्या संस्थांना विकून ईनपुट क्रेडीट टॅक्स वसुल करण्याचा धंदा हे लोक करीत असत. अशा प्रकारचे 290 कोटी रूपयांचे गैरव्यवहार आम्हाला त्यात आढळून आले आहेत असे जीएसटी इंटेलिजन्सच्या महासंचालकांनी सांगितले. या कंपनीच्या एका संचालकाला 5 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली आहे.