GST Hikes On Used Cars : भारतीयांकडून नवीन कारच्या तुलनेत जुन्या कारच्या खरेदी-विक्रीला अधिक प्राधान्य दिले जाते. मात्र, आता जीएसटी परिषदेच्या 55व्या बैठकीत जुन्या कारच्या खरेदी-विक्रीवर लागणाऱ्या कराबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे ग्राहकांच्या खिश्यावर कराचा अतिरिक्त भार पडणार आहे. जीएसटी परिषदेतील या निर्णयाबाबत सविस्तर जाणून घेऊया.
जुन्या कारवर लागणार 18 टक्के जीएसटी
जीएसटी परिषदेने इलेक्ट्रिक वाहनांसह सर्व जुन्या कारच्या खरेदीवरील जीएसटी दर 12 टक्क्यांवरून 18 टक्के करण्याचा निणय घेतला आहे. याचा परिणाम जुनी कार खरेदी करणाऱ्यांवर होणार आहे. तुम्ही जर डीलर्स अथवा कंपनीकडून जुनी कार खरेदी करत असाल तर गाडीच्या किंमतीवर 18 टक्के जीएसटी द्यावा लागेल. नवीन जीएसटी दर केवळ जुन्या कारची विक्री करणाऱ्या कंपन्या आणि डीलर्सकडून खरेदी केल्या जाणाऱ्या वाहनांवरच लागू असेल.
लक्षात घ्या की, तुम्ही जर थेट दुसऱ्या व्यक्तीकडून जुनी कार खरेदी करत असाल तर अशावेळी 12 टक्केच जीएसटी द्यावा लागेल. यासाठी तुम्हाला 18 टक्के जीएसटी द्यावा लागणार नाही.
इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर होणार परिणाम
नवीन जीएसटी दरांचा परिणाम इलेक्ट्रिक वाहनांवर देखील होणार आहे. सरकारकडून सातत्याने या वाहनांची विक्री वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तुम्ही जर नवीन इलेक्ट्रिक वाहन खरेदी करत असाल तर अशावेळी 5 टक्के जीएसटी द्यावा लागेल. परंतु, जुने इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याचा निर्णय घेतल्यास नवीन दरानुसार 18 टक्के जीएसटी भरावा लागेल.
नवीन जीएसटी दरांमुळे जुन्या इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत घट होण्याची शक्यता आहे. याशिवाय, जुन्या वाहनांची विक्री करणाऱ्या डीलर्स आणि कंपन्यांना देखील याचा फटका बसणार आहे. भारतीय बाजारात Maruti Alto k10, Wagon R आणि Hyundai Creta सारख्या गाड्यांच्या सेकंड हँड मॉडेल्सला विशेष मागणी आहे. मात्र, आता नवीन दरांचा विक्रीवर परिणाम पाहायला मिळू शकतो.