विकसकांना दोन्ही पर्यायांची मुभा; जीएसटी परिषदेचा निर्णय

 -मर्यादित काळासाठी जुने व नवे करदर स्वीकारता येणार

-परिषदेकडून करांच्या दरात मात्र कसलाही बदल नाही

नवी दिल्ली – जुन्या प्रकल्पाबाबत जीएसटी परिषदेने विकसकांना नव्या आणि जुन्या पर्यायांना स्वीकारण्याची मुभा दिली आहे. परिषदेने आज घेतलेल्या निर्णयानुसार जे प्रकल्प 31 मार्चपर्यंत पूर्ण झालेले नाहीत अशा प्रकल्पांना जीएसटीच्या करासाठी दोन्ही पर्याय उपलब्ध करण्यात आल्या. सरकारच्या या निर्णयाचे विकसकांनी स्वागत केले आहे. त्यांना जुन्या पद्धतीनुसार इनपुट टॅक्‍स क्रेडिटसह काम करण्याची संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांना नव्या इनपुट टॅक्‍स क्रेडिटशिवायचा पर्याय स्वीकारण्याचा पर्याय देण्यात आला आहे.

24 फेब्रुवारी रोजी परिषदेने तयार होणाऱ्या घरावरील जीएसटी कमी केला होता. त्या निर्णयानुसार किफायतशीर घरांचा जीएसटी पाच टक्‍क्‍यांवरून एक टक्के करण्यात आला होता. तर इतर तयार होणाऱ्या घरावरील जीएसटी 12 टक्‍क्‍यावरून आठ टक्‍के इतका करण्यात आला होता.

या नव्या कराची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून सुरू होणार असल्याचे सरकारने सांगितले होते. नव्या आणि जुन्या प्रकल्पांच्या स्थलांतराविषयी विकसकांना बहुधा 15 दिवस ते एक महिन्याचा वेळ दिला जाईल.

यामुळे विकसकांना घरांचा जुना साठा कमी करण्यास मदत होईल. एक एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नव्या प्रकल्पांना कराचे नवे दर लागू होतील. आणखी जीएसटी परिषदेची बैठक होणार आहे का असे विचारले असता निवडणुका होईपर्यंत पुन्हा बैठक होण्याची शक्‍यता कमी असल्याचे त्यांनी सांगितले. नव्या कर दरामुळे विकसक घरांचे दर वाढविण्याची शक्‍यता असल्याचे बोलले जाते.

त्यांनी सांगितले की राष्ट्रीय अतिरिक्त नफा विरोधी यंत्रणा या घडामोडींकडे लक्ष देईल. या घडामोडीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना अनारॉक प्रोपर्टी कन्सल्टंट चे अध्यक्ष अनुज पुरी यांनी सांगितले की, विकासक आणि ग्राहकादरम्यान कटुता टाळण्याचा स्मार्ट मार्ग सरकारने अवलंबिला आहे. यामुळे घराच्या दरात फारसा फरक पडेल असे वाटत नाही. सध्या या क्षेत्रात थोडीशी मंदी असल्यामुळे विकासकही घरांचे दर वाढविण्याची शक्‍यता कमी आहे. सध्या निवडणूक आचारसंहिता असल्यामुळे सरकारने करांच्या दरात हस्तक्षेप केला नसल्याचे दिसून येते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)