जीएसटी भवनाला आग; महत्त्वाची कागदपत्रचे जळून खाक झाल्याची भीती

मुंबई – मुंबईत काही दिवसांपासून आगी लागण्याचे सत्र सुरूच असून आज पुन्हा एकदा अशाच दुर्घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. माझगाव परिसरातील जीएसटी भवनच्या आठव्या मजल्याला आज भीषण आग लागली. या आगीमध्ये जीएसटीसंदर्भातील अनेक महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाल्याची भीती वर्तवली जात आहे. अर्थ खात्यानंतर्गत हे कार्यालय असल्याने ही इमारत अतिशय महत्त्वाची आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माझगाव येथील जीएसटी भवनाच्या आठव्या मजल्याला दुपारी 1 वाजेच्या सुमारास आग लागली. सुरुवातीला मुंबई अग्निशमन दलाला लेव्हल3 चा म्हणजेच गंभीर स्वरुपाची आगीचा कॉल देण्यात आला होता. परंतु ही लेव्हल 4ची आग असल्याचे अधिकाऱ्यांनी नंतर जाहीर केले. धूर जास्त असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचणी आल्या. 8व्या मजल्याला लागलेली आग अग्निशमन दलाच्या जवानांनी 9व्या मजव्यावर रोखली. पाण्याच्या 20 बंबाच्या मदतीने 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्‍यात आली. मात्र, या आगीचे निश्‍चित कारण समजु शकले नाही.

अन्‌ राष्ट्रध्वज सुरक्षित उतरवला

शिपाई कुणाल जाधव यांच्या प्रसंगावधानेचे सर्वत्र कौतुक

जीएसटी भवनाच्या आगीत शिपाई कुणाल जाधव यांनी प्रसंगावधान राखत 9 मजल्यावरील तिरंगा सुरक्षित उतरवला आहे. त्यांच्या या कृतीमुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. आगीच्या झळा हळुहळू ध्वजापर्यंत पोहचत होत्या. मात्र, जीवाची पर्वा न करता कुणाल यांनी तिरंगा ध्वज सन्मानपूर्वक खाली उतरवला. देशप्रेमातून ही कृती केल्याचे कुणाल यांनी सांगितले. मुंबईतील माझगाव परिसरात असलेल्या जीएसटी भवनच्या आठव्या मजल्यावर भीषण आग लागली होती. याच जीएसटी भवनाच्या नवव्या मजल्यावर तिरंगा फडकत होता. कुणाल जाधव हे गेल्या 16 वर्षांपासून जीएसटी भवनात शिपाई या पदावर कार्यरत आहे. ज्यावेळी आग लागली, त्यावेळी नवव्या मजल्यावरील तिरंग्याला त्याचा धोका असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तत्काळ कुणाल यांनी प्रसंगावधान राखत नवव्या मजल्यावरील तिरंगा सुरक्षित खाली उतरवला. देशाबद्दल असलेल्या प्रेमातून त्यांनी ही कृती केल्याचे त्यांनी सांगितले.

धूर येत असल्याचे समजताच इमारतीमधील कर्मचारी बाहेर पडल्याची माहिती इथे काम करणारे कर्मचारी सुशांत खोब्रागडे यांनी दिली. आगीत कोणीही अडकले नसल्याचे स्पष्ट झाले असून सर्व 300 कर्मचारी सुखरुप आहेत. या इमारतीमध्ये काही सरकारी कार्यालयेदेखील आहेत. त्यात कार्यालयीन कामकाजाचा आठवड्याचा पहिला दिवस असल्याने कर्मचाऱ्यांची वर्दळ होती.

दरम्यान, ही आग लागल्याचे समजताच उपमुख्यमंत्री अजित पवार हे बैठक सोडून घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर घटनेचा आढावा घेताना अजित पवार म्हणाले, या इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरु असताना ही आग लागल्याचे समजते. आगीमागील कारणं काय होती त्याची शाहनिशा अग्निशमन दल करेल, असे त्यांनी सांगितले. किती नुकसान झाले याचीही माहिती घेतली जाईल. मी अधिकाऱ्यांना विचारले त्यांनी सर्व डेटा आपल्याकडे असल्याचे सांगितले. तसेच अशा घटना घडता कामा नये. आपण मंत्रालयाला आग लागली होती तेव्हा सूचना दिली होती की, सर्व इमारतींचे स्ट्रक्‍चरल ऑडीत करुन घ्या. यासंदर्भात तपास करण्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकार घेईल, असे अजित पवार म्हणाले.

हिंमत असेल तर लोकसभेची निवडणूक घ्या; मलिकांचे फडणवीसांना आव्हान

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.