जीएसटीचा वर्धापनदिन साजरा होणार

नवी दिल्ली – वस्तू व सेवा कर म्हणजे जीएसटीची अंमलबजावणी सुरू होऊन एक जुलै रोजी दोन वर्षे होणार आहेत. त्यामुळे एक जुलै रोजी ह्या करप्रणालीचा वर्धापनदिन साजरा करण्याचे सरकारने ठरविले आहे. या कार्यक्रमात अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर उपस्थित राहतील. या कार्यक्रमाचे आयोजन आंबेडकर भवन येथे करण्यात आले असून जीएसटी करप्रणालीतील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित असतील.

यावेळी जीएसटीची वाटचाल कशी झाली आणि आगामी काळात काय करणे अपेक्षित आहे या संदर्भातील माहिती दाखविण्यात येईल. त्याचबरोबर यावेळी नवा विवरण फॉर्म जारी केला जाणार आहे. जीएसटीमुळे अप्रत्यक्ष कर प्रणालीतील करचुकवेगिरी थांबली आहे. त्यामुळे सरकारच्या महसुलात प्रत्येक महिन्याला काही प्रमाणात वाढ होऊ लागली आहे, असे कर अधिकाऱ्यांनी सांगितले.

या करात 17 स्थानिक कर एकत्रित करण्यात आल्यामुळे प्रत्येक कर भरण्याची गुंतागुंत कमी झाली आहे. बऱ्याच वाटाघाटीनंतर आणि मंथनानंतर 30 जून आणि 1 जुलै 2017 च्या मध्यरात्री ही करप्रणाली संसदेच्या केंद्रीय सभागृहातून सुरू करण्यात आली होती. त्यामुळे देशभर एक देश एक कर ही प्रणाली लागू झाली आहे. त्यामुळे देशाचे आर्थिक एकीकरण होण्यास मदत झाली आहे. गेल्या दोन वर्षात अनेक वस्तूंच्या करांमध्ये घट करण्यात आली असून आता केवळ हाताच्या बोटावर मोजता येणाऱ्या उत्पादनांच्या आणि सेवांच्या कराच्या दरात घट करणे बाकी आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.