मुंबई – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेत्यांमधील भेटीगाठी वाढल्या आहेत. त्यातून भाजप आणि मनसेमधील जवळीक वाढत चालल्याचे सूचित होत आहे. भाजपचे नेते विनोद तावडे यांनी सोमवारी राज यांची भेट घेतली. त्यापाठोपाठ मंगळवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही राज यांची भेट घेतली.
शिवतीर्थ या राज यांच्या निवासस्थानी ती भेट झाली. त्या भेटीगाठींमुळे भाजप आणि मनसे एकत्र येण्याची शक्यता वर्तवणाऱ्या चर्चांना पुन्हा खतपाणी मिळाले आहे. तोंडावर आलेली मुंबई पालिका निवडणूक यावेळी जिंकण्याचा चंग भाजपने बांधला आहे. त्या निवडणुकीच्या माध्यमातून शिवसेनेला राजकीय शह देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यामुळे मनसेला समवेत घेण्यास भाजप उत्सुक असल्याचे मानले जाते.
भाजपशी हातमिळवणी करण्याची मनसेची आकांक्षाही दडून राहिलेली नाही. राज यांनी मागील काही काळापासून हिंदुत्वावर जोर दिला आहे. भाजपबरोबर जाण्याचा मनसेचा मार्ग सुकर करण्यासाठीच त्यांनी ते पाऊल उचलल्याचा निष्कर्ष काढला जात आहे. (Growing closeness between BJP and MNS; Meeting of leaders increased)