सातारा – राज्यातील सर्व जिल्ह्यातील गट संसाधन केंद्र (पाणी व स्वच्छता ) कंत्राटी कर्मचारी संघटनेच्यावतीने मंगळवारपासून (दि. 14) बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. विविध मागण्यांसाठी हे आंदोलन होत असून आर्थिक व मानसिक खच्चीकरण होत असल्याचा आरोप संघटनेच्यावतीने होत आहे.
देशाला दिशादर्शक व मार्गदर्शने करणारे राज्य म्हणून महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे. केंद्र व राज्य स्तरावरून घोषित केलेल्या योजना या गाव पातळीवर प्रभावीपणे राबविण्याचे काम कंत्राटी कर्मचाऱ्यांमार्फत होत असते. शासनाच्या महत्वकांक्षी योजना स्वच्छ भारत मिशन, जल जीवन मिशन, संत गाडगेबाबा, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प व प्लास्टिक व्यवस्थापन, स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण, स्वच्छता ही सेवा,इतर राबविण्याचे काम तालुका स्तरावरील तालुका समन्वयक (बीआरसी/सीआरसी) गेली 10 ते 12 वर्षापासून अत्यंत कमी मानधनामध्ये करत आहेत.
अहोरात्र काम करून राज्य व जिल्ह्याला विविध पुरस्कार मिळवून देण्यात या कर्मचाऱ्यांचा महत्वाचा वाटा आहे. मात्र या कर्मचाऱ्यांना मिळणारे वेतन इतर योजनेतील कर्मचाऱ्यांपेक्षा खूप कमी प्रमाणात आहे. सरकारकडून या उच्च शिक्षित असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आर्थिक व मानसिक खच्चीकरण करण्याचे काम होत आहे.
गेली कित्येक वर्षे तुटपुंज्या वेतनावर हे कर्मचारी काम करत आहेत. पगार वाढ करणे, रिक्त पदे भरणे, आरोग्य विमा व सोयी सुविधा मिळणे व मागील स्थगित केलेली 10 टक्के मानधनवाढ अदा करणे या मागण्या बऱ्याच महिन्यांपासून प्रलंबित आहेत. याबाबत संपूर्ण महाराष्ट्रातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
याबाबत महाराष्ट्र राज्य गट संसाधन केंद्र (पाणी व स्वच्छता ) कर्मचारी संघटना साताराच्या वतीने आंदोलनाची हाक दिली आहे. याबाबत निवासी उप जिल्हाधिकारी प्रशांत आवटे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रोहित जाधव, उपाध्यक्ष, सौ. हेमा बडदे, प्रसिद्धी प्रमुख अमित गायकवाड, संघटक प्रियांका देशमुख, मनोज खेडकर,संतोष जाधव उपस्थित होते.