सातारा (प्रतिनिधी) – सेवकांच्या कार्यक्षमतेत वाढ व्हावी आणि संस्थेची प्रगती व्हावी, यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक प्रोत्साहनपर अनेक योजना राबवत असते. याचाच भाग म्हणून बॅंकेच्यावतीने सर्व सेवक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी एकत्रित ग्रुप मेडिक्लेम पॉलिसी घेण्यात आली आहे.
आपत्कालीन परिस्थितीत सेवकांना आर्थिक मदत व्हावी या हेतूने बॅंकेच्या संचालक मंडळाने सेवक कल्याण निधी स्थापन केला आहे. सद्य स्थितीत करोना संसर्ग व अन्य आजारांवरील उपचारांसाठी मोठ्या प्रमाणात खर्च येत आहे. ही बाब विचारात घेऊन संचालक मंडळाच्या पुढाकाराने सेवक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी ग्रुप मेडिक्लेम पॉलिसी घेण्यात आली आहे. यामध्ये सेवक, त्याची पत्नी, दोन मुले आणि आई-वडिल यांना आरोग्य विमा संरक्षण मिळणार आहे. ग्रुप मेडिक्लेम विमा पॉलिसीमध्ये प्रथमच सेवकाच्या आई व वडिलांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे सेवकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
दि. 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी बॅंकेचे अध्यक्ष आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते ग्रुप मेडिक्लेम पॉलिसीच्या वार्षिक हप्त्याचा धनादेश न्यू इंडिया ऍश्युरन्स कंपनीच्या विभागीय प्रबंधक शीला शिंदे व अधिकारी भरत निकम यांच्याकडे सुपुर्द करणेत आला. संचालक प्रकाश बडेकर, सौ. कांचन साळुंखे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक राजीव गाढवे, राजेंद्र भिलारे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.