गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ निलंबित

सातारा -महिला शिक्षिकेचा विनयभंग करुन तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केल्याच्या तक्रारीवरुन अटक करण्यात आलेल्या सातारा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांच्यावर राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने निलंबनाची कारवाई केली आहे. या कारवाईला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान, एखाद्या गटशिक्षणाधिकाऱ्यावर अशा प्रकरणात निलंबन होण्याच्या कारवाईने शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.

जिल्ह्यातील एका महिला शिक्षिकेला वारंवार त्रास देऊन तिच्या असाह्ययतेचा गैरफायदा घेत संजय धुमाळ याने तिच्या शाळेवर सतत भेटी दिल्या होत्या. शाळा तपासणीच्या नावाखाली तिला त्रास दिला जात होता. त्या शिक्षिकेला कारवाईची भीती दाखवून शरीर सुखाची मागणी धुमाळ याने केली.

याबाबत शिक्षिकेने अगोदर जिल्हा परिषदेकडे लेखी तक्रार केली. त्या तक्रारीच्या अनुषंगाने शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी दि. 14 जून ला तालुका विशाखा समितीला पत्र पाठवून कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, तालुका पंचायत समितीच्या विशाखा समितीकडून हालचाल न झाल्याने पीडित महिलेने सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

या गुन्ह्यात धुमाळ यास अटक केली होती. न्यायालयाने जामीनावर मुक्तता करताच पोलिसांच्या अहवालानुसार जिल्हा परिषदेने धुमाळ यांना दि.15 जुलै पर्यत सक्तीच्या रजेवर पाठवले होते. मात्र, धुमाळ यांना करोनाची बाधा झाल्याचे कारण देत पुन्हा रजा मागून घेतल्याची माहिती शिक्षण विभागातून देण्यात आली. धुमाळ यांच्याबाबत असलेल्या अनेक तक्रारींवरुन अनेक संघटनानी त्यांना निलंबित करण्याची मागणी केली होती.

भाजपच्या चित्रा वाघ यांनी साताऱ्यात येऊन जिल्हा परिषद प्रशासनाला याबाबत जाब विचारला होता. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेऊन शासनाकडे याबाबतचा अहवाल पाठवला होता. त्यानुसार धुमाळ यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्याची माहिती विनय गौडा यांनी दिली. निलंबनाचा कार्यकाळ संपल्यावर खातेनिहाय चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती शिक्षण विभागातून देण्यात आली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.