कराड (प्रतिनिधी) – विविध पिकांच्या सुधारीत वाणांची, पीक उत्पादन चाचणी घेण्यासाठी आणि विशिष्ठ पीक तंत्रज्ञानाची उत्पादन क्षमता तपासण्यासाठी कालवडे ता. कराड येथील कृषि विज्ञान केंद्राच्यावतीने समूह आद्यरेखा प्रात्यक्षिक घेतले जाणार आहे. काले, रेठरे खुर्द, कालवडे, वाठार येथील शेतकऱ्यांच्या शेतावर पुढील चार महिने हे प्रात्यक्षिक होणार आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाची सुधारीत तंत्रज्ञान आधारीत माहिती देण्यात येणार आहे.
कृषि विज्ञान केंद्रातर्फे सोयाबीन फुले संगम (केडीएस-726) या वाणाचे समूह आद्यरेखा पीक प्रात्यक्षिक हे एकाचवेळी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विविध पिकांच्या सुधारीत वाणांची, पीक उत्पादकता चाचणी घेण्यासाठी आणि प्रगत तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी दरवर्षी घेतले जाते. अशा पीक प्रात्यक्षिकांचा उपयोग शेतकऱ्यांना सुधारीत पीक तंत्रज्ञान अवलंबिण्यासाठी होतो. या प्रात्यक्षिक अंर्तगत शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाचे सुधारीत तंत्रज्ञान व आधुनिक लागवड पध्दत याविषयी कृषिविद्याचे विशेषज्ञ निलेश थोरात यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक विशेषज्ञ विशाल महाजन यांनी केले. कृषि विज्ञान केंद्राच्या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रभारी वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. भरत खांडेकर यांनी केले.
यावेळी कृषि विज्ञान केंद्राचे प्रकाश थोरात, प्रक्षेत्र व्यवस्थापक, पवन जोशी उपस्थित होते.
दरम्यान, परसबाग लागवडीचे आद्यरेखा पिक प्रात्यक्षिक काले गावातील महिलांच्या शेतावर राबवण्यात येणार आहे. प्रभारी वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. भरत खांडेकर यांच्या हस्ते महिलांना भाजीपाला बियाणांच्या स्वरुपात निविष्ठा वाटप करण्यात आले. यामध्ये मेथी, गवारी, भेंडी, मुळा, टोमॅटो, मिरची, वांगी, घेवडा, शेवगा, दोडका, कारले, दुधी भोपळा आदी भाज्यांचे बियाणे वाटप करण्यात आले. शेतकरी महिलांनी परसदारात किंवा गच्चीवर परसबाग लावून विषमुक्त सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला तयार करावा असे आवाहन करण्यात आले.