कलंदर: ग्राउंड रिपोर्ट…

उत्तम पिंगळे

श्री गणेशाचे पृथ्वीवर आगमन होऊन एक आठवडा लोटला. माता पार्वतीने सांगितल्याप्रमाणे नारदमुनी सर्वत्र श्री गणेशावर लक्ष ठेवून आहे. गौरी विसर्जनाबरोबर आलेल्या वरुणराजा बरोबरच श्रीनारद मुनींनी कैलासावर निरोप पाठवला तो पुढीलप्रमाणे-

हे पार्वती माते आपण या नारदाचे दंडवत स्वीकारावे. श्री वरुण देवाबरोबर मी भूतलावरील खुशाली कळवत आहे. कैलासाहून निघण्यापूर्वीच मी आपणास येथील परिस्थितीची कल्पना दिली होतीच. महाराष्ट्र देशी महापुराने प्रचंड नुकसान झालेले आहे. वरुणराजाने गणेशचतुर्थीच्या दिवशी मात्र अल्पविराम घेतला होता. त्यामुळे एक गोष्ट चांगली झाली सर्वत्र गणरायाचे आगमन सुकर व जल्लोषात झाले. पण त्याच दिवशी रात्रीपासून मात्र प्रामुख्याने मुंबापुरी, परशुरामभूमी व करवीरनगरी येथे वरुणराजाने पुन्हा आपला प्रताप दाखवायला सुरुवात केली व सर्वत्र पाणीच पाणी झाले.

अर्थात, माते, काळजी नसावी कारण येथील लोकांनी व मंडळाने आरास करताना यावेळी मंडप व मखराची उंची वाढवली होती व त्यामध्ये आपल्या आराध्यास बसविले होते. दीड दिवसांच्या गणपती विसर्जनाचे वेळी पाऊस होताच तरीही लोकांनी सर्वत्र काळजीपूर्वक विसर्जन केले. मग गौरीचे वेध लागले तसेच यावेळी श्री गणेशास वेगळ्या घरांमध्ये वास करावयास मिळाला. विशेषत: महाराष्ट्र देशी ज्या घरात आधी पाणी गेले होते अशा वेळी त्यांचे बंधू किंवा चुलतबंधू यांचे घरी त्या घराण्याच्या गणेशाची प्रतिष्ठापना झाली. म्हणून श्री गणेशास वेगवेगळी घरे पाहावयास मिळाली; परंतु यावेळी गणरायाचे आगमन व वरुणराजामुळे लोकांनाही आपापल्या नातेवाईकांकडे तसेच सार्वजनिक गणेश मंडळांत जाणे जमले नाही. याचे मुख्य कारण म्हणजे बाहेर पडल्यावर परत नक्‍की कधी परत येता येईल हीच धास्ती होती. रस्ते, लोहमार्ग पाण्याखाली जात होते. अर्थात, सर्वच ठिकाणी श्री गणेशाची चांगली काळजी घेतली गेली आहे.

मुंबापुरीत पाणी वाढू लागल्यावर अनेक मंडळांचे कार्यकर्ते सर्वत्र धावून जाताना दिसत होते. मूषकराज मात्र यावेळी एकदम मूग गिळून गप्प आहे. सर्वत्र पाणी होत असल्याने मी त्यांना बजावले होते की श्री गणेशाची साथ अजिबात सोडू नये. बाकी सारे ठीक आहे.

आपण सांगितल्याप्रमाणे काही ठिकाणी मी श्रीगणेशास नैवेद्य बदलून दिला. एकंदरित या गणेशोत्सवात वरुणराजाची अवकृपाच आहे पण सध्या उत्सवाच्यावेळी अधूनमधून उसंत घेऊन पडत आहे. काळजी नसावी. मी श्री गणेशाबरोबरच अनंतचतुर्दशीला कैलासवर येऊन आपणास भेटेन. पुन्हा एकवार दंडवत.

सदरचा निरोप वाचल्यावर पार्वती मातेने वरुण देवास जरा खडसावले की काय एवढी अवकृपा करत आहेस तू? यावर वरुणदेव म्हणाले, माते, माझे हात बांधलेले आहेत. देवेंद्राचा आदेश मला मानावा लागतो. मानव निसर्गावर कुरघोडी करू पाहात आहे आणि त्याला समज द्यावी या हेतूने मला माझे कार्य पार पाडावे लागत आहे. आपण श्री गणेशास मानवाला निसर्ग रक्षणाची बुद्धी द्यावी असे सांगावे. म्हणजे इंद्रदेवाचा कोप होणार नाही. आता मला आज्ञा द्यावी कारण पुन्हा महाराष्ट्र देशी हजेरी लावायची आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×