न्युयॉर्क : अमेरिकन राष्ट्रपतीपदाची निवडणूक ही चांगलीच रंगली आहे. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन यांच्यात विजयासाठी लढत चुरशीची होताना दिसत आहे. आता बायडन विजयाच्या समीप पोहोचले आहेत, मात्र ट्रम्प मतगणनेच्या विरोधात न्यायालयात गेल्याने अंतिम निकाल येण्यासाठी वेळ लागत आहे. दरम्यान राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या वतीने दाखल केलेल्या मिशिगन आणि जॉर्जियामधील केसेस न्यायालयाने फेटाळल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर स्वीडनमधील पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने ट्रम्प यांना चिमटा काढला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्याच शब्दात ग्रेटा थनबर्गने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. ग्रेटा म्हणाली कि, हे खूपच हास्यास्पद आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी रोगावरील अॅंगर मॅनेजमेंटवर काम केले पाहिजे. किंवा त्यांनी आपल्या एखाद्या मित्राबरोबर छानसा जुना चित्रपट पाहावा. शांत व्हा ट्रम्प.. शांत व्हा, असे ट्विट तिने केले आहे.
So ridiculous. Donald must work on his Anger Management problem, then go to a good old fashioned movie with a friend! Chill Donald, Chill! https://t.co/4RNVBqRYBA
— Greta Thunberg (@GretaThunberg) November 5, 2020
अमेरिका टाइम मॅगझीने २०१९ साली ग्रेटा थनबर्गला पर्सन ऑफ द इयर घोषित केले होते. त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांना हा निर्णय फारसा रुचला नव्हता. ट्रम्प यांनी ग्रेटाला रागावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला होता. तेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रेटाला अॅंगर मॅनेजमेंटवर काम करण्यास सांगत मित्रासोबत चित्रपट पाहण्याचा सल्ला दिला होता. शांत हो ग्रेटा शांत, असे ट्विट केले होते. याच अंदाजात अमेरिका राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत ट्रम्प यांना सल्ला दिला आहे.
So ridiculous. Greta must work on her Anger Management problem, then go to a good old fashioned movie with a friend! Chill Greta, Chill! https://t.co/M8ZtS8okzE
— Donald J. Trump (@realDonaldTrump) December 12, 2019
दरम्यान, १७ वर्षीय ग्रेटाने मागील वर्षी सप्टेंबरमध्ये हवामान बदल थांबवण्यासाठी संयुक्त राष्ट्रे संघात हवामान कृती परिषदेला आलेल्या जगभरातील नेत्यांवर ग्रेटा संतापली होती.