उत्तुंग सुळक्‍यावरून राजमाता जिजाऊंना अभिवादन

नाशिक येथील “नवरी’ सुळक्‍यावर चढाई : राजमाता जिजाऊंच्या जयंतीचे औचित्य

पिंपरी – नाशिकमधील तीनशे फूट उंच आणि चढाईस अवघड असणाऱ्या नवरी या सुळक्‍यावर चढून गिर्यारोहकांनी राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांना अभिवादन केले तर करोनासोबत लढत असलेल्या योद्‌ध्यांना सलाम केला.

गिर्यारोहकांच्या साहसाला आव्हान देणारा महराष्ट्रातील नाशिकमध्ये असणारा नवरी सुळका भोसरीतील रोहित शांताराम जाधव या तरुणाने तीन तासांच्या खडतर प्रयत्नांनंतर सर केला. त्यांना पुण्यातील होमोपॅथिक कन्सल्टंट डॉ मनीषा सोनवणे यांची साथ मिळाली. पॉइंट ब्रेक ऍडव्हेंचर ग्रुपच्या मार्गदर्शनाखाली स्वामी विवेकानंद व जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून ही कामगिरी पार पाडण्यात आली.

जाधव हे मूळचे साताऱ्याचे असून, नोकरीनिमित्त भोसरीमध्ये स्थायिक आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनातही जाधव यांनी नोकरी सांभाळून गिर्यारोहणाची आवड जोपासली असून वजीर, लिगांणा सारखे अवघड सुळके त्यांनी सर केले आहेत.

शारीरिक व मानसिक क्षमतेचा कस पाहणारा हा सुळका नाशिकपासून साधारण 25 किलोमीटर अंतरावर आहे. सुळक्‍याच्या आजुबाजुला अंजनी ब्रह्मगिरी पर्वत आहे. याबाबत रोहित जाधव म्हणाले, हा सुळका सर करण्यासाठी सकाळी चढाई करण्यास सुरुवात केली. साधारण तीन तासांनी सुळका सर करण्यात यश आले.

चिमणी क्‍लाइंबिंग द्वारे ही मोहीम पूर्ण करण्यात आली. पॉइंट ब्रेक एडवेंचर या संस्थेचे सदस्य मोहिमेमध्ये टेक्‍निकल सपोर्ट म्हणून उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.