अभिवादन : राजीव गांधी; कणखर व दूरदृष्टीचे नेतृत्व

आज 21 मे राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने मी त्यांच्या स्मृतीला प्रथम वंदन करतो. देशाच्या स्वातंत्र्याकरिता महत्त्वपूर्ण योगदान देऊन नेतृत्व करणाऱ्या, स्वातंत्र्यानंतर देशाला प्रगतीपथावर नेणाऱ्या नेहरू-गांधी घराण्याचा उज्ज्वल वारसा त्यांना लाभला होता. कणखर व दूरदृष्टीचे ते पंतप्रधान होते, त्यानिमित्त…

21 मे, 1991- आजही मला त्या दिवसाची खूप आठवण येते. रात्री सव्वादहा वाजता युवराज शहांचा मला लॅन्डलाइनवर फोन आला आणि राजीव गांधींची हत्या झाली, असे सांगितले. मनात धस्स झाले. निवडणुकीचा कालावधी होता. प्रचार करून रात्री दहा वाजता घरी पोहोचलो होतो व कुटुंबीयासमवेत जेवण करत असतानाच ही बातमी कळाली. या बातमीवर मुळीच विश्‍वास बसला नाही म्हणून मी शहानिशा करण्यासाठी “पीटीआय’ला फोन केला. त्या ठिकाणावरूनही असेच उत्तर आले. राजीव गांधींची हत्या झालेली आहे आणि शरीर छिन्नविच्छिन्न झालेले असून त्यांच्या पायातील स्पोर्टस शूजवरून ते राजीव गांधीच आहेत अशा प्रकारची बातमी मिळालेली आहे, असे त्यांनी मला सांगितले. घरातील प्रत्येक माणसाला कुटुंबातील कोणीतरी गेले अशा प्रकारची भावना निर्माण झाली.

डेहराडूनच्या डून स्कूल, ट्रिनिटी कॉलेज केंब्रीज, इंपिरिअल कॉलेज, लंडन येथे इंजिनिअरिंगचे शिक्षण घेऊन 1966 मध्ये ते भारतात परतले. त्यांची आवड असणारे क्षेत्र म्हणजे विमानोड्डाण त्यामुळे पायलटचे प्रशिक्षण घेऊन ते एअर इंडियात पायलट म्हणून रूजू झाले. श्रीमती इंदिरा गांधी तेव्हा देशाच्या पंतप्रधान होत्या. कोणतेही राजकीय पद राजीव गांधींना मिळाले असते. मात्र, त्याऐवजी नोकरी करणेच त्यांनी पत्करले.
23 जून 1980 या दिवशी संजय गांधींचा अपघाती मृत्यू झाल्यावर मात्र पंतप्रधान असणाऱ्या श्रीमती इंदिरा गांधींना मदत करण्यासाठी त्यांनी राजकारणात प्रवेश केला. नवी दिल्ली येथे 16 फेब्रुवारी 1981 रोजी झालेल्या विराट शेतकरी मेळाव्यात त्यांनी केलेले भाषण साऱ्या देशाला प्रेरणा देऊन गेले. भारताच्या राजकीय क्षितिजावर त्यांच्या रूपाने नवा तारा चमकू लागला होता. अमेठीमधून ते खासदार म्हणून निवडून आले. 1982 साली झालेल्या भारतातील एशियाड या स्पर्धेमध्ये त्यांनी स्वत:ला झोकून देऊन ही स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये महत्त्वाचा वाटा उचलला.

1984 मध्ये पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधींची हत्या झाली. तो दिवस राजीव गांधींच्या जीवनात “टर्निंग पॉइंट’ ठरला. या हत्येच्या धक्‍क्‍यातून सावरत कॉंग्रेस पक्षाने राजीव गांधींना देशाचे 6 वे पंतप्रधान बनविले, तो दिवस होता 31 ऑक्‍टोबर 1984. त्यानंतर खऱ्या अर्थाने “राजीव युग’ सुरू झाले. दुर्दैवाने ते फार वर्षे टिकले नाही. ते या देशाचे दुर्दैवच मानावे लागेल.

राजीव गांधींनी बलशाली आणि स्वयंपूर्ण देशाचे स्वप्न बघितले. कोट्यवधी गरिबांच्या जीवनात नवचैतन्य आणण्यासाठी आरोग्य, शिक्षण आणि रोजगार याला त्यांनी प्राधान्य दिले. कृषिप्रधान देश हा औद्योगिक देश म्हणून ओळखला जावा यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जोड प्रत्येक निर्णयाला त्यांनी दिली. टेलिकॉम क्षेत्रातील ख्यातनाम सॅम पित्रोदा यांना त्यांनी आवर्जुन अमेरिकेहून बोलाविले आणि त्यांच्या मदतीने दूरसंचार क्षेत्रात भारताचा पाया त्यांनी पक्‍का रोवला. देशातील हजारो शहरे, गावे, अगदी खेडीदेखील दूरसंचार साखळीत गुंफली गेली आणि देशात लाखो तरुणांना “एसटीडी’ व “आयएसडी’ बूथद्वारे रोजगार मिळाला.

आज प्रत्येकाच्या हातात दिसणारा मोबाइल फोन व इंटरनेट यांचे श्रेय राजीव गांधींच्या दूरदृष्टीला जाते. त्यांनी “एमटीएनएल’ ही सरकारी कंपनी स्थापन करून साऱ्या देशभर अगदी खेड्यापाड्यांत टेलिफोन एक्‍स्चेंज उभारले तसेच माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या म्हणजे आयटी यांची मोठी वाढ व्हावयास हवी हे लक्षात घेऊन आयटी उद्योगाच्या विकासासाठी अनेक धोरणे राबवली. तेव्हाच्या सोव्हिएत युनियनऐवजी अमेरिका व अन्य पाश्‍चिमात्य देशांशी जवळीक साधून त्यांनी देशाच्या परराष्ट्र धोरणातदेखील नवी दिशा दिली.

राजकीय स्तरावर चालत असलेली आयाराम गयाराम संस्कृती मोडीत काढण्यासाठी त्यांनी 52वी घटनादुरुस्ती करून पक्षांतर बंदी कायदा आणला. त्यामुळे घोडेबाजार बंद पडला आणि सरकारे स्थिर होण्यास मदत झाली. आज पक्षांतरबंदी कायदा भारतीय राजकीय पटलावर महत्त्वाचा मानला जातो; परंतु हा कायदा मोडीत काढण्याचे काम आता सुरू झाल्याचे क्षणोक्षणी जाणवते. सन 1986 मध्ये त्यांनी नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण आखून शहरी व ग्रामीण भागात शिक्षणाचा पाया बळकट करण्यास सुरुवात केली. यामुळे शेकडो शाळा व महाविद्यालये उभी राहिली व त्यातून महिला, मागासवर्गीय व गरीब यांना इयत्ता पहिलीपासून उच्च शिक्षणापर्यंत सहजतेने शिक्षण घेण्याचा मार्ग मोकळा झाला. तसेच सन 1987 मध्ये “ऑपरेशन ब्लॅक बोर्ड’ ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना राबवून शिक्षणाची कोट्यवधी पुस्तके व अन्य साहित्य त्यांनी उपलब्ध करून दिली. नवी दिल्ली येथे इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी स्थापन करून त्यांनी देशाच्या शिक्षण व्यवस्थेत मोठी भर घातली.

भारतासारख्या कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी त्यांनी अनेक क्रांतिकारी धोरणे राबविली. अधिक उत्पादन देणाऱ्या बी-बियाणांची निर्मिती, खते व कीटकनाशके यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती करण्यावर त्यांनी भर दिला. तसेच शेती उत्पादनांना वाढीव किमान हमीभाव दिला. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात हरितक्रांती केली ती राजीव गांधींनी पुढे नेली हे निश्‍चित. जलसंधारणाच्या कामामध्ये त्यांनी विशेष लक्ष दिले होते, ही बाब कदाचित सामान्य नागरिकांना माहीत नसेल.

मालदीवचे अध्यक्ष गयूम यांच्या विरोधात श्रीलंकेतून आलेल्या तामिळ अतिरेक्‍यांनी सशस्त्र बंड केले. मालदीवची राजधानी माले येथील अनेक शासकीय इमारती ताब्यात घेतल्या. परागंदा झालेल्या अध्यक्ष गयूम यांनी भारताकडे मदत मागितली आणि क्षणाचाही विलंब न लावता पंतप्रधान राजीव गांधी यांनी 3 नोव्हेंबर 1988 रोजी दोन हजार किमी दूर असणाऱ्या मालदीवमध्ये लष्करी विमानातून 1 हजार 600 पॅराटुपर्स पाठवून हे बंड मोडून काढले.

21 मे 1991 रोजी चेन्नईपासून 40 किमी अंतरावर असणाऱ्या श्रीपेरांबदूूर येथे झालेल्या जाहीर सभेत तमिळ अतिरेक्‍यांनी केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात त्यांचा दुर्दैवी अंत झाला आणि देश एका महान नेत्यास मुकला.

– ऍड. अभय छाजेड, सरचिटणीस- महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.