सातारा – धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र वढू बुद्रुक येथील महाराजांच्या समाधिस्थळी सोमवारी पहाटे पुष्पचक्र अर्पण करून खा. उदयनराजे भोसले यांनी अभिवादन केले. छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो शंभूभक्त समाधिस्थळी नतमस्तक होण्यासाठी येतात. दरवर्षी राज्याच्या विविध भागातून शंभूज्योत आणली जाते; परंतु यावर्षी करोनामुळे गर्दी टाळण्यासाठी पुण्यतिथीचा कार्यक्रम स्थानिक पातळीवर आयोजित करण्यात आला.
छत्रपती संभाजी महारांजाच्या समाधिस्थळी नित्यनेमाने होणारी पूजा ग्रामस्थांनी पहाटे केली. महाराजांच्या समाधीवर जलाभिषेक करण्यात आला. त्यानंतर खा. उदयनराजे भोसले यांनी पुष्पचक्र अर्पण करून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन केले. त्यानंतर उदयनराजेंनी कवी कलश यांच्या समाधीवर फुले वाहून दर्शन घेतले आणि संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. प्रथेप्रमाणे उपस्थित ग्रामस्थांनी संभाजी महाराजांची प्रार्थना करून अभिवादन केले.
उदयनराजेंच्या हस्ते समाधी परिसरात रक्तचंदन आणि अजान वृक्षाचे रोप लावण्यात आले. वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. सचिन पुणेकर यांनी या वृक्षाचे महत्त्व सांगितले. वृक्षारोपणासाठी विविध नद्यांचे पाणी आणल्याचे मिलिंद गायकवाड यांनी सांगितले.