अभिवादन: म. फुलेंच्या विचारांची वर्तमानकालीन मौलिकता

पांडुरंग म्हेत्रे

महाराष्ट्रातील शोषणाधिष्ठित सामाजिक चौकटीला छेद देऊन नवीन सामाजिक संरचनेसाठी क्रांतिकारक परिवर्तन घडवून आणणारे महात्मा ज्योतीराव फुले हे कर्ते महापुरूष होते. समाज उद्धारासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या ज्योतीरावांच्या निधनाला आज सव्वाशे वर्षांचा काळ उलटला तरी आजच्या जागतिकीकरणाच्या संघर्षशील जीवनात या महात्म्याकडून आपल्याला बरेच काही शिकण्यासारखे आहे. हा विचार सर्वांनी करायला हवा. ज्योतीरावांनी सर्वांना शिक्षण, स्त्री-पुरुष समानता, जातीनिर्मूलन, संसाधनाचे फेरवाटप आणि धर्मचिकित्सेच्या आधारे आधुनिक भारताचा पाया घातला. आजच्या सामाजिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक परिस्थितीतील विदारकता पाहता म. फुलेंच्या विचारांची मौलिकता स्पष्ट होते.

तत्कालीन समाज धार्मिक व सामाजिक गुलामगिरीत अडकल्याकारणाने गुलामगिरीच्या बेड्या तोडण्यासाठी म. फुलेंना स्फोटक विचार मांडावे लागले. समाजातील जातीयता, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा यांचे समूळ उच्चाटन करणे हा त्यामागील हेतू होता. आजच्या परिस्थितीचे सूक्ष्म निरीक्षण केले असता या समस्यांची तीव्रता आणखी वाढल्याचे लक्षात येते. आपला देश बाहेरून एकसंध दिसत असला तरी आतून पोखरला गेला आहे. धार्मिक कलह, प्रांतवाद, जातीय मोर्चे, विशिष्ट धर्मीयांना वाटणारी असुरक्षितता, पद्मावत व दशक्रिया यांसारख्या चित्रपटावरून निर्माण होणारे वाद ही त्याची उदाहरणे आहेत. आपल्या नावामागे लागणारी जात कर्तृत्वापेक्षा श्रेष्ठ मानली जात आहे. जातीयता व धर्मभेद पाळणे कायद्याने गुन्हा असून देखील जातीधर्माचे भूत माणसातून बाजूला होत नाही. जाती-पोटजातीतील भेद तीव्र असून तणाव वाढतच आहे. याकरिता समाजाने म. फुलेंच्या सामाजिक समतेची ज्योत तेवत ठेवून मानवतावादी मूल्यांवर आधारित नवसमाज निर्मितीसाठी पाऊल टाकणे गरजेचे आहे.

रूढी परंपरेच्या विळख्यात आजही समाज तितकाच अडकलेला आहे. परिस्थिती नसतानाही परंपरा जीवापाड जपल्या जात आहेत. नाहीतर लातूर जिल्ह्यातील शीतल वायाळ या मुलीला लग्न करण्याकरिता हुंड्यासाठी पैसे नाहीत म्हणून आत्महत्या करण्याची वेळ आली नसती. “सार्वजनिक सत्यधर्म’ या ग्रंथात म. फुलेंनी लग्न या महत्त्वाच्या विषयाबाबत मौलिक विचार मांडले आहेत. समाजाने ते विचार समजून घेतले असते तर, शीतलसारख्या मुली आज आनंदात जगू शकल्या असत्या. सामाजिक बहिष्कार, नरबळी, हुंडाबळी यांसारख्या बातम्या वर्तमानपत्रात झळकत असतात. त्यातून विकृत मनोवृत्तीचे दर्शन घडत आहे. परस्परात भेद करणारी मनोवृत्ती टिकून राहणे एकात्मतेस बाधक आहे.

स्त्रीप्रतिष्ठेला म. फुले यांनी अधिक महत्त्व दिले आहे. पुरूषप्रधान संस्कृतीत स्त्रियांना मिळणारे गौणत्व त्यांना मान्य नव्हते. या समस्येच्या मुळाशी गेल्यानंतर त्यांना स्त्री शिक्षणास सुरुवात करावीशी वाटली. पत्नी सावित्रीबाईंनादेखील ते कधी एकेरी संबोधत नसत. आज स्त्रियांवर होणारी दडपशाही, शोषण, छळ, लैंगिक अत्याचार, प्रसंगी हिंसा, स्त्रीभ्रूण हत्या या गंभीर समस्या उभ्या आहेत. स्त्री पुरुषांबरोबरीने काम करत असल्याचे दिसत असले तरी वस्तुस्थिती निराळीच आहे. एखाद्या महत्त्वाच्या पदावर स्त्री असली तरी तिला तिथे नगण्य स्थान आहे. स्त्रीमुक्ती चळवळ उपेक्षितांपर्यंत पोहेचली नाही. म्हणून वर्तमान परिस्थितीत स्त्रियांनी म. फुलेंच्या विचार प्रवाहाने प्रेरित होऊन जीवन जगण्याची व समाजाला नवी दिशा देण्याची गरज आहे.

समाजात बुवा, बाबा, अम्मा यांचे प्रमाण वाढत आहे. त्यांच्या मठांनी व आश्रमांनी देशाच्या कानाकोपऱ्यात गर्दी केली आहे. जादूटोणा, अंगारे, भानामती, दैवीशक्‍ती, लिंबू सुयांचे उतारे असा उपद्‌व्याप ते करतात. आसाराम, रामरहिम ही त्यापैकीच असणारी बोलकी व जिवंत उदाहरणे आहेत.

शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे, सुशिक्षित मंडळी, उद्योजक अशा लबाडांच्या चरणाला स्पर्श केल्याशिवाय कामाला सुरुवात करीत नाहीत. म्हणून म. फुलेंच्या विचारांची आज खऱ्या अर्थाने गरज आहे. म. फुले अशा ढोंगी साधूंना म्हणतात की, अजाण, अज्ञानी, पांगळ्या मुलांसाठी शाळा काढाव्यात, अन्नदान करावे आणि हेच निर्मिकाचे स्मरण समजून पुण्य पदरात पाडून घ्यावे.

भारताच्या एकसंधपणाला व लोकशाहीला जाती-धर्मामुळे तडा जात आहे. जाती-धर्मावर आधारित राजकारणामुळे भारतीय समाजशक्‍तीचे विभाजन होत आहे. वर्तमान राजकारणातील काहींना समाज मागास व दरिद्री अवस्थेत असावा असे वाटते. कारण सुशिक्षित समाजामुळे आपले राजकीय अस्तित्व धोक्‍यात येण्याची त्यांना भीती आहे. अशांचा भरणा सर्व जाती-धर्मात आहे. ज्योतीरावांच्या मते, राजकर्ते कोण आहेत हे महत्त्वाचे नसून राजसत्तेचा वापर कोणासाठी व कसा करीत आहेत, हे जास्त महत्त्वाचे आहे.

म. फुले यांच्या “शेतकऱ्याचा असूड’ या ग्रंथाचा हेतू शेतकऱ्यांची आर्थिक विषमता दूर करणे हाच आहे. या ग्रंथातून त्यांनी शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी आर्थिक समानता प्रस्थापित करण्याची मागणी केली. शेतकऱ्यांच्या दयनीय अवस्थेला अनेक कारणे आहेत, त्यापैकी कर्जबाजारीपणा हे एक आहे. कर्जबाजारीपणा दोन-चार वर्षांत निर्माण झाला नसून कित्येक वर्षांची नापिकी, दुष्काळ, अतिवृष्टी, अयोग्य बाजारभाव, व्यापक उत्पादन खर्च या कारणांमुळे निर्माण झाला आहे. बी-बियाण्यांच्या बाबतीतही तो परावलंबीच आहे. याला शासकीय धोरण जबाबदार असून शेतकऱ्यांचे शोषण मोठ्या प्रमाणात चालू आहे, असे विचार म. फुले यांनी मांडले आहेत. आजही हे प्रश्न कायम असून ते सोडवण्यासाठी नेटाचे प्रयत्न कोणी करत असल्याचे दिसत नाही. आज कर्जमाफी जाहीर झाली असली तरी त्यातील किचकट गुंतागुंत प्रचंड असल्याने शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणे सहज शक्‍य नाही. आपल्या कृषीप्रधान देशातील शेतकरी रोजच आस्मानी-सुलतानी संकटांशी सामना करत आहे. संपूर्ण व्यवस्थेच्या विरोधात हा भूमिपुत्र रोजच लढत आहे. त्याला या संकटातून बाहेर काढण्यासाठी म. फुलेंच्या विचारांची आवश्‍यकता आहे.

वर्तमान परिस्थितीत जागतिकीकरणामुळे भांडवली तत्त्व हे नवशिक्षण व्यवस्थेचे केंद्र बनले आहे. परिणामी गरिबांचे शिक्षण हरवत चालले आहे. सक्‍तीचे व मोफत शिक्षण देण्यास व्यवस्था असमर्थ ठरत आहे. अशावेळी म. फुलेंनी मांडलेला शिक्षणविचार किती दूरदृष्टीचा होता हे लक्षात येते. आजच्या शैक्षणिक, धार्मिक, सामाजिक, आर्थिक व शेतीविषयक क्षेत्रात ज्या अडचणी निर्माण झाल्या आहेत त्यांचे निराकरण करून इष्ट बदल घडवून आणण्यासाठी म. ज्योतीराव फुले यांनी मांडलेले मूलगामी विचार उपयुक्‍त ठरू शकतात. त्यांच्या विचाराने अस्वस्थ समाजजीवनात परिवर्तन घडून सुसंस्कृत समाजाची निर्मिती होऊ शकते म्हणून महात्मा फुलेंच्या विचारांची वर्तमानकालीन परिस्थितीतील मौलिकता महत्त्वाची असल्याचे जाणवते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.