मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मंत्री जयंत पाटील यांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन केले. त्यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 6 डिसेंबर रोजी 63 वा महापरिनिर्वाण दिन आहे. त्यानिमित्ताने महामानवाला अभिवादन करण्यासाठी त्यांचे अनुयायी चैत्यभूमी, दादर परिसरात मोठ्या प्रमाणात येतात. आज सकाळपासूनच अनुयायी चैत्यभूमीकडे येण्यासाठी गर्दी करत आहेत. त्यामुळे परिसरात वाहनांची गर्दी होऊन वाहतूककोंडी होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन येथील वाहतुकीत काही बदल करण्यात आले आहेत.
वाहतूक कोंडी होऊन अनुयायांची गैरसोय होऊ नये म्हणून शिवाजी पार्क, दादरकडे जाणाऱ्या वाहतुकीचे नियमन करण्यासाठी वाहतूक निर्बंध लादण्यात आले आहेत. तसेच येथील वाहतुकीत काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत, अशी माहिती मुंबई वाहतूक पोलिसांनी दिली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येथील काही मार्ग एक दिशा करण्यात आले असून मार्गांवर पार्किंगसाठी निर्बंध घालण्यात आले असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले. चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांची गैरसोय टाळण्यासाठी वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमानुसार पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.