नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात २१ दिवसांचे लॉकडाउन जाहीर केले आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोरोना व्हायरसच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी सर्वजण पुढे येत आहेत. या सर्वात महत्वाची मदत ठरली ती म्हणजे केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजेच सीआरपीएफने केलेली मदत. या जवानांनी आपले एकदिवसाचे वेतन कोरोनाबाधितांसाठी दिले आहे.
सीमेपासून देशाच्या महत्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेची जबाबदारी सीआरपीएफकडे आहे. सीआरपीएफचे अधिकारी आणि जवानांनी ३३ कोटी ८१ लाख रुपयांचा धनादेश पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमध्ये जमा केला आहे. कोरोना व्हायरसच्या या संकटाच्या काळात आम्ही देशासोबत ठामपणे उभे आहोत असे सीआरपीएफने म्हटले आहे.
दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रविशंकर प्रसाद आणि काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपलं एक महिन्याचं वेतन करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. नितीन गडकरी यांनी आपले एक महिन्याचे वेतन पंतप्रधान मदत निधीसाठी देण्याची घोषणा केली आहे. तसंच त्यांनी इतरांनाही या परिस्थितीत मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. “मी करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी एक महिन्याचे वेतन पंतप्रधान मदत निधीमध्ये देण्याचा निर्णय घेतला आहे. या महामारीशी लढण्याकरीता मी लोकांना पुढे येण्याचं आणि मदत करण्याचे आवाहन करतो, असे गडकरी म्हणाले.