नवी दिल्ली- गाझियाबाद येथील ऑक्सिजन प्लांटमधून गुरू तेज बहादूर रुग्णालयापर्यंत ग्रीन कॅरिडॉर करून ऑक्सिजन टँकर एका तासात नेल्याने मोठी दुर्घटना टळली. पोलीसांनी शनिवारी रात्री ही माहिती दिली.
हे दिल्लीतील सर्वात मोठे करोना रुग्णालय आहे. तेथे सध्या 700 जण उपचार घेत आहेत. हा टँकर पोहोचला त्यावेळी तेथे अवघा दीड तास पुरेल एवढाच ऑक्सिजन शिल्लक होता.
मोदीनगर मधून ऑक्सिजन टँकर आणायचा आहे असा शासकीय नोडल अधिकाऱ्याचा दूरध्वनी सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास आला. आम्ही उत्तर प्रदेश पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. टँकर आणि त्याच्या चालकाविषयीची माहिती दिली आणि घेतली. त्यानंतर आम्ही टँकर आणण्यासाठी पथक रवाना केले. त्यामुळे एक तासात ऑक्सिजन पोहोचू शकला, असे पोलीस उपायुक्त आर. सत्यसुंदरम यांनी सांगितले.