“ग्रीन बूक’ला ऑस्कर पुरस्काराचा मान

सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार रामी मलेकला

लॉस एंजिलीस  – चित्रपट सृष्टितील सर्वोच्च समजला जाणारा 91 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा कॅलिफोर्नियामधल्या डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. यावेळी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पिटर फेरील दिग्दर्शीत ग्रीन बूक या चित्रपटाला दिला गेला असून या चित्रपटाला ऑस्करमध्ये एकूण पाच नामांकने होती. त्यातल्या तीन पुरस्कारांवर “ग्रीन बुक’ने आपली मोहर उमटवली. ज्यात ओरिजनल स्क्रीनप्ले, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, सर्वोत्तम चित्रपटाचा ऑस्कर “ग्रीन बुक’ने पटकावला आहे.

सर्वोत्तम चित्रपटाच्या शर्यतीत एकूण आठ चित्रपट होते. सुरूवातीपासूनच दी बोहेमियन ऱ्हाप्सडी, रोमा, ब्लॅक पॅंथर या चित्रपटांमध्ये चुरस पहायला मिळण्याची शक्‍यता होती. मात्र, यावेळी ग्रीन बुकने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला. दी बोहेमियन ऱ्हाप्सडी आणि रोमा या चित्रपटांनी प्रत्येकी चार गटांमध्ये ऑस्कर पटकावले. तर, ब्लॅक पॅंथरने तीन विभागांमधील पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली आहे.

यंदा सर्वाधिक 10 नामांकने मिळवणाऱ्या ‘रोमा’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा विभागातील ऑस्कर जिंकला आहे. तसेच या चित्रपटासाठी अल्फोन्सो क्‍युरॉन यांनाही सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीसाठी ऑस्कर मिळाला. तर, सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर रामी मलेक यांनी बोहेमियन ऱ्हाप्सडी या चित्रपटातील भूमिकेसाठी पटकावला. भारतीय चित्रपट निर्माते गुनीत मोंगा यांच्या पिरियड, एंड ऑफ सेंटेंस या लघुपटाला ऑस्कर मिळाला आहे. तर “अ स्टार इज बॉर्न’मधील “शॅलो’ या गाण्यासाठी लेडी गागा हिला ऑस्कर मिळाला आहे. तर, 11 वर्षांनतर पहिल्यांदाच स्पायडरमॅन आणि ब्लॅकपॅंथर या सुपरहिरोंनी ऑस्करपर्यंत मजल मारली. “स्पायडरमॅन’ला सर्वोत्तम ऍनिमेटेड चित्रपटाचा ऑस्कर मिळाला आहे. तर, ब्लॅक पॅंथरने ओरिजनल स्कोर, सर्वोत्कृष्ट वेशभुषा, सर्वोत्कृष्ट प्रोडक्षन डिझाईनचा पुरस्कार पटकावला.

यंदा 1989 नंतर प्रथमच ऑस्कर सोहळा सुत्र संचलना शिवाय पार पडला असून यंदाच्या ऑस्कर सोहळा काही दिवसांपूर्वी वादात सापडला होता. “दी ऍकेडमी ऑफ मोशन पिक्‍चर आर्टस ऍण्ड सायन्सेस’ने चार मोठ्या श्रेणीतील पुरस्कार यंदा ऑफ एअर देण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे मोठा वाद झाला होता.

कोणाला मिळाला ऑस्कर
सर्वोत्कृष्ट चित्रपट : ग्रीन बूक.
सर्वोत्कृष्ट अभिनेता : रामी मलेक (बोहेमियन रॅप्सोडी).
सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपट : रोमा.
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : रेजिना किंग (इफ बील स्ट्रीट कुड टॉक).
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : महेरशाला अली (ग्रीन बुक).
सर्वोत्कृष्ट निमेटेड फीचर फिल्म : स्पायडर-मॅन : इनटू द स्पायडर-वर्स.
सर्वोत्कृष्ट निमेटेड शॉर्ट फिल्म : बाओ.
सर्वोत्कृष्ट व्हिजुअल इफेक्‍ट : फस्ट मॅन.
सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्क्रीनप्ले : ग्रीन बुक.
सर्वोत्कृष्ट ओरिजनल सॉंग : लेडी गागा (शॅलो- अ स्टार इज बॉर्न).

भारतीय निर्माती गुनित मोंगाची ऑस्करवर मोहोर

यंदाच्या ऑस्करमध्येही भारतीय चित्रपट नसले तरी भारतीय निर्माती गुनित मोंगाने पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली आहे. गुनित मोंगा यांच्या “पिरियड. एंड ऑफ सेंटेंस’ ला सर्वोत्कृष्ट डॉक्‍युमेंटरी शॉर्ट सब्जेक्‍टचा ऑस्कर प्रदान करण्यात आला आहे.

दिल्लीलगतच्या हापूर गावातील एका महिलेची कहाणी या चित्रपटात आहे. हा माहितीपट दिल्लीतील हपूर गावावर आधारित आहे. या गावामध्ये मासिकपाळीबद्दल अनेक गैरसमज लोकांच्या मनात आहेत. मासिकपाळीच्या दरम्यान घ्यायच्या काळजीबद्दल अनेक महिला अनभिज्ञ आहेत त्यामुळे या महिलांना आरोग्याच्या अनेक तक्रारींना समोर जावे लागते. या गावात सॅनिटरी पॅड्‌स बनवणारे मशिन बसवले जाते. पैसे जमा करून हे मशिन्स बसवले जाते त्यानंतर महिला पॅड्‌स तयार करायला शिकतात, आरोग्याविषयी जागृती निर्माण होते अशा स्वरुपाचा हा माहितीपट आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.