कुडाळ येथे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा गौरव
कुडाळ – शिक्षकांपुढे अनेक प्रश्न आहेत ते सोडविण्यासाठी शिक्षक समिती नेहमीच अग्रणी असते. आज चांद्यापासून बांद्यापर्यंत समितीचे संघटन झालेले आहे. पतसंस्थेच्या माध्यमातून जावळी तालुक्यातील शिक्षकांची आर्थिक गरज भागवण्याचा प्रयत्न होत आहे. तालुक्यातील शिक्षकांचे कामकाज उत्कृष्ट असून पतसंस्थेने विद्यार्थी व त्यांचा उचित सन्मान केला आहे. शिक्षक समितीने जावली तालुक्यात उभारलेल्या पतसंस्थेचे कार्य उल्लेखनीय असून मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून शिक्षक समितीचे सर्व प्रलंबित प्रश्न सोडवले जातील असे आश्वासन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले.
कुडाळ (ता. जावळी) येथे तालुक्यातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचा गुणगौरव आणि नूतन कार्यकारिणीचा सत्कार कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, आज शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणारे तरुण शिक्षक समितीच्या पाठिशी आहेत. संघटनेत राज्याध्यक्ष उदय शिंदे यांना शिक्षक समितीने राज्याची धुरा दिली असून हा सर्व जावळीकरांचा सन्मान आहे. राजकीय पटलावर अनेक बदल घड़त राहतात. प्रवाहाच्या विरोधात राहून तालुक्याचे प्रश्न सुटणार नाहीत. बदलाची दिशा समजूनच राजकीय वाटचालिचा निर्णय घेतला आहे. यापुढेही शिक्षक समितीला सर्वोपतरी सहकार्य राहील अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
राज्याध्यक्ष उदय शिंदे म्हणाले, समितीच्या माध्यमातून शिक्षकांचे प्रश्ऩ, मागण्या शासन दरबारी मांडून त्या सोडवण्यासाठी शिक्षकांनी पाठीशी रहावे. गटशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. यावेळी तालुक्यातील इयत्ता 5 वी तील सन 2018,2019 मध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
जावली तालुका शिक्षक समितीची नूतन कार्यकारिणी जाहिर करून पदाधिकाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला. पतसंस्थेचे अध्यक्ष धिरेश गोळे यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष शंकर देवरे, सुरेश चिकणे, तानाजी आगुंडे यांनी आपले विचार व्यक्त केले.
शामराव जुनघरे व नितीन जाधव यांनी सूत्रसंचालन केले नितीन मोहिते यांनी आभार मानले. या कार्यक्रमास महामंडळाचे अध्यक्ष दीपक पवार, राज्याध्यक्ष उदय शिंदे, माजी सभापती अरुणाताई शिर्के,शिक्षक बॅंक संचालक किरण यादव, संपूर्ण जिल्हयातील शिक्षक समितीचे कार्यकारिणी सदस्य, जावली तालुका शिक्षक समिती कार्यकारिणीचे आजी, माजी सदस्य, सेवानिवृत्त कार्यक्रमास शिक्षक समितीचे शिक्षक, सभासद, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.