महापालिकेच्या योजनांचा 22 हजार महिलांना लाभ : 3,830 बचत गटांना सहाय्य
पुणे – घरातील महिला कमावू लागली, आर्थिक निर्णय घेण्याची ताकद तिला मिळाली, की अख्ख्या कुटुंबाची प्रगती होते. ही बाब लक्षात घेऊन पुणे महापालिकेने गेल्या चार वर्षांमध्ये महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध 19 योजनांची आग्रहाने अंमलबजावणी केल्याने 22 हजार 701 महिला आणि 3,830 महिला बचत गटांना याचा फायदा झाला. या महिला विविध व्यवसायांत ठामपणे उभ्या राहिल्या आणि प्रगती करू लागल्या.
महिला सक्षमीकरण आणि बचत गटांवर लक्ष केंद्रित करतानाच महापालिकेने गेल्या चार वर्षांत स्वयंरोजगार आणि उच्च शिक्षणासाठीही योजना प्रभावीरित्या राबविल्या. महापालिकेच्या व्यावसायिक प्रशिक्षण आणि स्वयंरोजगार या दोन महत्त्वकांक्षी योजना आहेत. तसेच बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य विकासापासून उत्पादन विक्रीपर्यंत सर्व प्रकारची मदत महापालिकेतर्फे केली जाते. महिलांना स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्यासाठी पाच हजार रुपयांचे अर्थसहाय्य केले जाते.
स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी शिक्षण हा सर्वांत महत्त्वाचा घटक आहे, त्या दृष्टीने दहावी, बारावीसाठी खासगी शिकवणी, सीईटी परीक्षेसाठीची तयारी आणि वैद्यकीय, संगणक, अभियांत्रिकी, एमबीएसारखा अभ्यासक्रमांसाठीही गुणवान विद्यार्थिनींना दरवर्षी दहा हजार रुपयांचे अर्थसहाय्य केले जाते.
विविधस्तरांतील महिलांना कायदेशीर आधार देण्यासाठी पुणे महापालिकेतर्फे सक्षमा कक्ष हे स्त्री संसाधन केंद्र चालवले जात आहे. याद्वारे कौटुंबिक सल्ल्यापासून कायदेविषयक मार्गदर्शन, पाठबळ निर्मितीसाठी मार्गदर्शन, महिला संघटीकरण, स्वसंरक्षण प्रशिक्षण दिले जाते. सध्या शहरात प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय पातळीवर 15 सक्षमा कक्ष सुरू आहेत.
याशिवाय काम करणाऱ्या महिलांना त्यांच्या बाळांसाठी सुरक्षित पाळणाघराची सोय करण्यासही प्रारंभ झाला आहे. शिवाजीनगरमधील हे पाळणाघर सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत सुरू असते आणि त्यासाठी नागरिकांकडून दरमहा 150 रुपये इतके नाममात्र शुल्क आकारले जाते.
उल्लेखनीय योजना
– ‘लाडकी लेक’ मुलगी दत्तक योजना
– महाविद्यालयीन तरुणींसाठी कमवा आणि शिका योजना’
– 15 ते 25 वर्षे वयोगटातील तरुणींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण
– उद्योजकता विकास शिबिर
कुटुंब आणि देशाच्याही अर्थकारणात योगदान देणाऱ्या मातृशक्तीसाठी योजना राबविणे, हा कर्तव्याचा भाग आहे. पुणे महापालिकेच्या वतीने आम्ही अनेक योजना राबवतो आहोत. गेल्या चार वर्षांत महिलांसाठीच्या योजनांचे यश हा आमच्यासाठी समाधानाचा विषय आहे.
– गणेश बिडकर, सभागृह नेता, मनपा