हडपसर – दरवर्षी गणेशोत्सवात नवीन कालव्यावर तसेच मुळा- मुठा नदीवर जाऊन गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यात येत होते.मात्र,यावर्षी कोरोना महामारी आणि जलप्रदूषण होऊ नये यासाठी महापालिकेने पुढाकार घेऊन मूर्ती संकलन व फिरत्या हौदात मूर्ती विसर्जनचा स्तुत्य उपक्रम राबविला आहे. हडपसर- मुंढवा क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील गणेश भक्तांनी आजपर्यंत तब्बल दोन हजार सातशे मूर्ती दान केल्या. एकूणच हडपसरमधील नागरिकांनी गणेश मूर्ती संकलनाला मोठा प्रतिसाद दिला.
गत वर्षीच्या तुलनेत अवघ्या सात दिवसांत मूर्ती संकलीत होण्याची संख्या पाच पटीने अधिक आहे. गेल्या वर्षी पहिल्या सात दिवसात ५३८ गणेश मूर्ती संकलन तर ७३३ किलो निर्माल्य जमा झाले होते. तर यावर्षी पहिल्या सात दिवसात २६५४ मूर्ती संकलित झाल्या असून ३२५५ किलो इतके निर्माल्य जमा झाले आहे.
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मुर्त्या पाण्यात लवकर विरघळत नाहीत. त्यामुळे मूर्तीची दुरावस्था होते. त्याचबरोबर जलप्रदूषण देखील मोठ्या प्रमाणावर होते. त्यासाठीच मूर्ती संकलन हा उपक्रम राबविला जात आहे.तसे आवाहन गणेश स्थापनेच्या दिवसापासून करण्यात आले होते. यासाठी मूर्ती संकलन केंद्रे तसेच फिरते विसर्जन हौदाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. जेणेकरून अशा प्लास्टर ऑफ पॅरिस च्या मुर्त्या एकत्र करून पारंपरिक पध्दतीने वाघोली येथील खाणीत विसर्जित केल्या जातात. आतापर्यंत संकलित झालेल्या या सर्व गणेश मूर्ती वाघोलीत विसर्जित करण्यात आल्याचे हडपसर – मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त प्रसाद काटकर यांनी सांगितले.
“गणपती मूर्ती संकलनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून यात १०० टक्के घरगुती गणपतींचा समावेश आहे. गणेश विसर्जनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे अनंतचतुर्थीलाही नागरिकांनी तसेच सार्वजनिक मंडळांनी कालवा किंवा नदीवर न जाता गणेश मूर्ती संकलन करून महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे, जलप्रदूषण टाळावे.” – प्रसाद काटकर
सहाय्यक आयुक्त – हडपसर – मुंढवा क्षेत्रीय कार्यालय.