उत्तर प्रदेश पोलिसांना मोठा दिलासा! विकास दुबे प्रकरणी क्लीन चिट; सबळ पुरावा नाही

नवी दिल्ली : गँगस्टर विकास दुबे आणि त्याच्या सहकाऱ्यांना चकमकीत ठार केल्याप्रकरणात उत्तर प्रदेश पोलिसांना मोठा दिलासा मिळाला आहे. निवृत्त न्यायाधीश बी.एस.चौहान यांच्या चौकशी समितीने उत्तर प्रदेश पोलिसांना क्लीन चिट दिली आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. विकास दुबेने आठ पोलिसांना ठार केल्यानंतर बदला घेताना पोलिसांनी विकास दुबेला बनावट चकमकीत ठार केल्याचा आरोप होता. मात्र क्लीन चिट मिळाल्याने उत्तर प्रदेश पोलिसांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आठ महिने तपास केल्यानंतर जस्टीस बीए.स.चौहान समितीने उत्तर प्रदेश पोलिसांविरोधात कोणताही पुरावा नसल्याचे सांगितले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांची बाजू खोटी ठरवणारा एकही साक्षीदार सापडला नाही. जुलै महिन्यात पोलिसांनी विकास दुबेला ठार केले होते. यावेळी त्यांनी विकास दुबे पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याने ठार केल्याचे सांगण्यात आले होते.

जुलै २०२० मध्ये उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये पोलीस आणि गुडांमध्ये चकमक झाली होती. यावेळी विकास दुबेच्या सहकाऱ्यांनी आठ पोलीस कर्मचाऱ्यांना ठार केलं होतं. ६० हून अधिक गुन्हे दाखल असणाऱ्या विकास दुबेला पकडण्यासाठी पोलीस कानपूरमध्ये गेले होते. पोलीस बिकरु गावात पोहोचले असता त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला होता.

यानंतर एका आठवड्याने मध्य प्रदेशात विकास दुबेला अटक करुन कारने उत्तर प्रदेशात आणले जात होते. यावेळी महामार्गावर कारचा अपघात झाला आणि पलटी झाली. विकास दुबेने यावेळी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी गोळ्या घालून ठार केले होते. यानंतर विरोधकांनी चकमकीवरुन प्रश्नचिन्ह उपस्थित करत योगी सरकारला घेरले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.