पुणे – राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेंतर्गत सन 2021-22 या शैक्षणिक वर्षाकरिता विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या मुदतीत 30 जून पर्यंत वाढ करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
या योजनेंतर्गत परदेशी नामांकित विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना 18 जून 2021 पर्यंत मुदत देण्यात आलेली होती, परंतु बहुतांश विद्यार्थ्यांना परदेशातील संबंधित विद्यापीठांकडून कोविडच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे विहित मुदतीत ऑफर लेटर प्राप्त न झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी मुंडेंकडे मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली होती.
त्यानुसार धनंजय मुंडे यांनी विभागाला निर्देश देत ही मुदत 30 जून 2021 पर्यंत वाढविण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार आज 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याने अनुसूचित जातीतील इच्छुक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
परदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी विहीत नमुन्यातील अर्ज शासनाच्या www.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरील रोजगार या लिंकवरुन डाऊनलोड करुन घ्यावा. सदर परिपुर्ण अर्ज [email protected] या ईमेलवर पाढवून त्याची हार्ड्कॉपी विहीत मुदतीत व आवश्यक ते कागदपत्रासह , समाज कल्याण आयुक्तालय 3, चर्च पथ, महाराष्ट्र राज्य, पुणे- ४११००१ या पत्यावर सादर करावा. असे आवाहन समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.
सदर योजनेंतर्गत महाराष्ट्रातील अनूसूचित जातीच्या प्रवर्गातील पदव्युत्तर पदवी आणि पी.एच.डी.साठी अद्ययावत (Qx World University Ranking) 300 च्या आतील परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या 75 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येणार आहे.