शेतकऱ्यांना मोठा दिलासा! पहिल्या टप्प्यात 2 हजार 297 कोटींचे लवकरच वाटप

मुंबई – अवकाळीपासून आणि अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 10 हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती.

पण पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या मदतीला उशीर लागण्याची शक्‍यता होती. पण अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाने आचारसंहिता काळातही शेतकऱ्यांना मदत देण्यास परवानगी दिली आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्य सरकारने जाहीर केलेल्या 10 हजार कोटी रुपयांपैकी 2 हजार कोटी रुपयांचा पहिला हप्ता देण्यात आला आहे. आता पहिल्या टप्प्यातील मदतनिधी जिल्हाधिकाऱ्यांकडे जाईल. त्यानंतर 2 ते 3 दिवसात शेतकऱ्यांना त्याचे वाटप करण्यात येईल, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे.

यावेळी वडेट्टीवारांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्व विदर्भ आणि पश्‍चिम विदर्भ मिळून 566 कोटी, मराठवाड्यासाठी 2 हजार 639 कोटी, नाशिक विभागासाठी 450 कोटी, पुणे विभागासाठी 721 कोटी, तर कोकण विभागासाठी 104 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

या संदर्भात आज निवडणूक आयोगाने पत्र पाठवून मदत वाटपाबद्दलच्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पूरग्रस्त भागाचा दौरा करून 10 हजार कोटींची नुकसानभरपाई देण्यात येईल, असे जाहीर केले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील मदत लगेच वितरीत केला जाणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.

वडेट्टीवार म्हणाले, राज्य सरकार हे विदर्भाच्या विरोधात आहे असे दाखवण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे. नुकसानग्रस्त भागासाठी राज्याला केंद्राकडून मदतीची अपेक्षा होती. पण विरोधी पक्षाने त्यासाठी काहीच केले नाही, अशी टीका त्यांनी भाजपवर केली आहे. विरोधकांनी मदतीसाठी केंद्राकडे मागणी करावी, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.