मुंबई : देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी रिझर्व्ह बँकेने मोठा दिलासा दिला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने काही महत्वाचे निर्णय घेतले. रेपो रेट कमी करण्याबरोबर कर्जदारांना त्यांनी मोठा दिलासा दिला. सर्वसामान्यांवरील कर्जाच्या हप्त्याचे ओझे वाढू नये यासाठी ते न भरण्याची मुभा तीन महिन्यांसाठी देण्यात आली होती. ती मुदत आता आणखी तीन महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे.
यापूर्वी मार्च, एप्रिल, मेसाठी ही सवलत देण्यात आली होती. आता आणखी तीन महिन्यांसाठी ही मुदत वाढवण्यात आली आहे. म्हणजे जून, जुलै आणि ऑगस्टपर्यंत कर्जाचा हप्ता न भरण्याची मुभा असेल. कर्जांवरील व्याज भरण्यास दिलेली स्थगिती आणखी तीन महिन्यांनी वाढवण्यात आलेली आहे.
करोनाच्या संकटाचा परिणाम जगभरातील आर्थिक घडामोडींवर झाला आहे. करोनामुळे जगभरातील आर्थव्यस्थेचे मोठे नुकसान झाले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. रेपो दरात ४० बेसिस पॉईंट्सची कपात करण्यात आल्याची माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिली. आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रेपो दर कपातीमुळे सामान्यांना दिलासा मिळणार असून कर्जावरील व्याज कमी होणार आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज सकाळी रेपो रेट संदर्भात महत्वाची घोषणा केली आहे. रेपो रेटमध्ये ४० बेसिक पॉईंटची कपात करण्यात आली आहे. रेपो रेट आता ४.४ टक्क्यावरुन ४ टक्के करण्यात आला आहे. रिव्हर्स रेपो रेट ३.३५ टक्क्यापर्यंत कमी करण्यात आला आहे. महागाई दर नियंत्रणात राहील अशी आरबीआयला अपेक्षा आहे. संपूर्ण जगाचा प्रवास मंदीच्या दिशेने सुरु आहे असे शक्तीकांत दास यांनी सांगितले.