नवी दिल्ली : करोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात धुमाकूळ घातला असतानाच आता सर्वांसाठी दिलासादायक वृत्त समोर येत आहे. देशात मागील २४ तासांत करोनाबाधितांची संख्या चांगलीच घटली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मागील 24 तासांत देशामध्ये 1,52,734 नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर 3128 नागरिकांना करोनामुळे प्राण गमवावे लागले. नव्या करोनाबाधितांच्या तुलनेच मागील दिवसभरात करोनामुक्त होणाऱ्यांचा आकडा जास्त होता.
तब्बल 2,38,000 रुग्ण करोनातून बरे झाले. याआधी शनिवारी देशात एकूण 165553 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती. ही एकंदर आकडेवारी पाहता काही अंशी नव्या रुग्णसंख्येत घट होत असल्याचे दिसत आहे.
सलग 18 व्या दिवशी देशात नव्या रुग्णांच्या तुलनेत करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. 30 मे पर्यंत देशात 21 कोटी 31 ला 54 हजार 129 करोना लसी देण्यात आल्या आहेत. रविवारी 10 लाख 18 हजार लसी देण्यात आल्या. तर दुसरीकडे देशात करोना चाचण्यांवरही तितकाच भर देण्यात येत आहे. आतापर्यंत 34 कोटी 48 लाखांहून अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.