स्कायमेट संस्थेकडून मान्सूनचा अंदाज जाहीर
पुणे – देशात यंदाही म्हणजे सलग चौथ्या वर्षी चांगला मान्सून बरसण्याचा दिलासादायक अंदाज आहे. “स्कायमेट’ या हवामानविषयक अभ्यास करणाऱ्या संस्थेने ही माहिती दिली आहे. अंदाजानुसार देशात यंदा मान्सून सामान्य म्हणजे “नॉर्मल’ शक्यता आहे. यंदा पावसाचे प्रमाण सरासरी 98 टक्के राहण्याचा अंदाज आहे. दरम्यान, महाराष्ट्रावर यंदाही पावसाची माया टिकून राहण्याचा अंदाज आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेचा डोलारा कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. त्यात पाऊस हा महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे हवामान अंदाजाकडे शेतकऱ्यांसह व्यापारी, उद्योजक आणि एकूणच भारतीयांचे लक्ष असते.
दरम्यान, भारतीय हवामान विभागदेखील मान्सूनविषयक अंदाज व्यक्त करतो. या महिन्याच्या अखेरीस हा अंदाज जाहीर होण्याची शक्यता आहे. हा पहिला दीर्घकालिन अंदाज असतो. त्यानंतर मेच्या मध्यात दुसरा अंदाज जाहीर केला जातो.
राज्यनिहाय पावसाची शक्यता
राजस्थान, गुजरात सोबत नागालॅंड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस बरसण्याची शक्यता आहे. जुलै- ऑगस्ट महिन्यात केरळ आणि कर्नाटकात थोडा कमी पाऊस होण्याचा अंदाज आहे.
पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र, मध्य प्रदेशात सरासारीपेक्षा अधिक पाऊस होण्याचा अंदाज आहे. यंदा जून महिन्यातच पावसाची धमाकेदार एन्ट्री होण्याची शक्यता आहे. पूर्वार्धामध्ये उत्तरार्धापेक्षा अधिक चांगला पाऊस होणार आहे.