ऑस्ट्रेलियाचा कसोटीपटू मार्नस लेबुशेन याने व्यक्त केले मत
मेलबर्न – भारतीय संघ या वर्षाअखेरीस ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर येत आहे. गेल्या काही वर्षांत भारतीय संघाने परदेशात सातत्याने सरस कामगिरी केली आहे. त्यामुळे यंदा त्यांच्याविरुद्ध ऑस्ट्रेलिया संघासमोर अशाच प्रकारची कामगिरी करण्याचे आव्हान राहणार आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा कसोटीपटू मार्नस लेबुशेन याने व्यक्त केले आहे.
गेल्या काही वर्षांत भारताला अत्यंत दर्जेदार वेगवान गोलंदाज मिळाले आहेत. त्यांनी गत दौऱ्यात ऑस्ट्रेलियाला मायदेशातच पराभूत करण्याची ऐतिहासिक कामगिरी केली होती. जसप्रीत बुमराह, महंमद शमी, भुवनेश्वर कुमार, ईशांत शर्मा असे दर्जेदार गोलंदाज त्यांच्या ताफ्यात आहेत.
बुमराह व शमीचा सामना करणे अत्यंत कठीण आहे. येथील हिवाळी वातावरणात चेंडू जास्त स्विंग होतो, त्यामुळे शमी जास्त प्रभावी ठरेल. तो नवा चेंडू जितका स्विंग करतो तितकाच जुना चेंडूदेखील स्विंग करतो. तसेच बुमराह व शमी हे दोघेही चेंडू रिव्हर्स स्विंग करू शकतात, सुरुवातीची काही षटके त्यांची गोलंदाजी सावधपणेच खेळावी लागणार आहे, असे मत लेबुशेनने व्यक्त केले.
भारतीय संघाची गोलंदाजी तर बळकट आहेच पण त्यांची फलंदाजीदेखील सशक्त आहे. कर्णधार विराट कोहलीला बाद करणे आज जगातील प्रत्येक संघांसमोर आव्हान असते.
नव्या नियमांचेही आव्हान
करोनाचा धोका अद्याप कायम असल्याने त्याबाबत तयार करण्यात आलेले नियम तंतोतंत पाळावे लागणार आहेत. चेंडूला लाळ किंवा घाम लावता येणार नसल्याने चेंडू स्विंग कसा होणार. त्यामुळे फलंदाजांपेक्षा गोलंदाजांसमोरच अशा नियमांचे आव्हान राहणार आहे, असेही लेबुशेनने सांगितले.